Obesity: कमी झोप घेणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतो, तज्ज्ञांचा इशारा

Obesity: अलीकडेच झालेल्या एका संशोधनात धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. आपण कमी झोप घेतो तेव्हा केवळ थकवा किंवा एकाग्रतेची समस्या निर्माण होत नाही तर याचा थेट संबंध वजन वाढण्याशी जोडला जातो. म्हणजेच अपुरी झोप ही लठ्ठपणाचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते.
झोपेअभावी शरीरात काय बदल होतात?
झोप कमी झाल्यावर शरीरातील ग्रेलिन (भूक वाढवणारा हार्मोन) वाढतो व लेप्टिन (पोट भरल्याची जाणीव करून देणारा हार्मोन) कमी होतो.
त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागते आणि आपण जास्त प्रमाणात, अनेकदा चुकीचे पदार्थ (तळलेले, गोड, थंड पेये) खाऊ लागतो.
झोपेच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिझम मंदावतो. म्हणजे शरीरातील कॅलरी जाळण्याचा वेग कमी होतो व अतिरिक्त कॅलरी फॅटच्या स्वरूपात साठू लागतात.
ताण वाढवणारा कॉर्टिसोल हार्मोन झोप कमी झाल्यावर जास्त प्रमाणात तयार होतो. त्यामुळे सुद्धा जास्त खाण्याची इच्छा होते आणि पोटाभोवती चरबी साचते.
कमी झोपेमुळे केवळ वजनच वाढत नाही तर अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो :
हृदयरोग
मधुमेह (डायबिटीज)
डिप्रेशन व मानसिक आरोग्याच्या समस्या
स्मरणशक्ती कमी होणे
पचनासंबंधी त्रास, कब्ज
वजन नियंत्रणासाठी किती झोप घ्यावी?
तज्ज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तींनी रोज किमान ७ ते ८ तासांची गाढ व अखंड झोप घ्यायला हवी. ही झोप शरीर आणि मेंदू दोन्हींसाठी आवश्यक आहे.
चांगली झोप येण्यासाठी उपाय
दररोज ठरलेल्या वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा.
झोपण्यापूर्वी मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप यांचा वापर टाळा.
झोपण्यापूर्वी जड किंवा तेलकट अन्न घेऊ नका; हलके जेवण करा.
दिवसभर पुरेसे पाणी प्या, शरीर हायड्रेटेड ठेवा.
दारू व कॅफिनयुक्त पेये (चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक) टाळा.
दिवसातून थोडा वेळ व्यायाम जरूर करा.
झोपण्याची खोली शांत, अंधारी व आरामदायक ठेवा.
एकंदरीत, योग्य आहाराइतकंच पुरेशी झोपही वजन नियंत्रणासाठी तितकीच महत्त्वाची आहे. झोपेत काटकसर करणे म्हणजे हळूहळू आरोग्याशी तडजोड करणे.





