#NZvPAK 3rd T20 : पाकची हाराकिरी सुरूच, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यासह मालिकाही गमावली…

NZvPAK 3rd T20 : पाकिस्तान संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका गमावली आहे. यजमान संघाने 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला. ड्युनेडिन येथील युनिव्हर्सिटी ओव्हल मैदानावर पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडकडून सलामीवीर फिन ऍलनने 137 धावांची खेळी केली. प्रथम खेळताना न्यूझीलंडने 20 षटकात बाद 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ केवळ 20 षटकात 7 बाद 179 धावा करू शकला आणि सामना गमावला. तिसऱ्या सामन्यातील विजयासह मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.
New Zealand win the third T20I by 45 runs.#NZvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/NIvCdCZy3T
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 17, 2024
या सामन्यात फलंदाजीसाठी खेळपट्टी तितकी सोपी नव्हती. न्यूझीलंडचा प्रत्येक फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडत होता पण अॅलनने 16 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 137 धावा केल्या. सुमारे 221 च्या स्ट्राइक रेटने त्याने 62 चेंडूंवर ही खेळी खेळली. अॅलनने 48 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हरिस रौफच्या एकाच षटकात त्याने 27 धावा केल्या. अॅलनशिवाय एकाही किवी फलंदाजाला अर्धशतकही गाठता आले नाही. टीम सेफर्टने 23 चेंडूत 31 धावा केल्या.
गोलंदाजीत पाकिस्तानच्या सर्व 5 गोलंदाजांनी विकेट घेतल्या पण कोणाचीही इकोनाॅमी 8 पेक्षा कमी नव्हती. रौफने 4 षटकात 60 धावा दिल्या होत्या. कर्णधार शाहीनने 43 आणि मोहम्मद नवाजने 44 धावा दिल्या. किवी संघ शेवटच्या दोन षटकात केवळ 13 धावा करू शकला, त्यानंतरही धावसंख्या 224 पर्यंत पोहोचली.
पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकात 10 धावा काढून सैम अयुब बाद झाला. त्याने 13 चेंडूंचा सामना केला. रिझवानने 24 धावा करण्यासाठी 20 चेंडू घेतले. बाबर आझमने एक बाजू सांभाळली पण दुसऱ्या बाजूकडून सातत्याने विकेट पडत होत्या. फखर जमानने 10 चेंडूत 19 धावा केल्या. आझम खानलाही 7 चेंडूत केवळ 10 धावा करता आल्या.
बाबरने आपले अर्धशतक पूर्ण केले पण ते विजयासाठी पुरेसे नव्हते. 37 चेंडूत 58 धावांची खेळी खेळून तो बाद झाला. त्याच्या विकेटसह पाकिस्तानच्या सर्व आशा संपुष्टात आल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक 2 बळी घेतले. या मैदानावर न्यूझीलंडचा संघ अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना हरलेला नाही.





