#NZvPAK : न्यूझीलंडचा संघ दोन वेळा पाकिस्तानचा दौरा करणार

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघ पुढील वर्षी तसेच 2023 साली असे दोन वेळा पाकिस्तान दौरा करणार आहे, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने दिली आहे.
न्यूझीलंड संघ दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी पाकिस्तानचा दौरा करेल आणि त्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी 2023 सालच्या एप्रिलमध्येही पाकिस्तानचा दौरा करणार आहे.
या वर्षी सुरक्षेच्या कारणाने रद्द झालेल्या दौऱ्याची ही भरपाई ठरेल, असेही मंडळाने सांगितले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने घेतलेल्या बैठकीत याबाबत निश्चिती करण्यात आली.
दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने अनुक्रमे आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद व आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा भाग असतील. दुसऱ्या दौऱ्यात दोन अतिरिक्त एकदिवसीय सामने खेळले जातील. यावेळी पाच एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.





