NZ vs SA : रचिन-विल्यमसनच्या शतकांच्या जोरावर न्यझीलंडने उभारला धावांचा डोंगर, दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले तब्बल ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य

NZ vs SA Semi Final Champions Trophy 2025 : केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर न्यूझीलंडने ५० षटकांत ६ गडी गमावून ३६२ धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यांनी त्याच स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध पाच बाद ३५६ धावांचे सर्वोच्च लक्ष्य गाठणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मागे टाकले. जर दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना नवा इतिहास रचावा लागेल आणि सर्व जुने विक्रम मोडावे लागतील.
केन-रचिनची दुसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी –
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने विल यंगची विकेट लवकर गमावली, जो २१ धावा करून बाद झाला. मात्र, यानंतर रचिन आणि विल्यमसन यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी शानदार १६४ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, रचिनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतकही झळकावले. शतक ठोकल्यानंतर रचिन बाद झाला. त्याने १०१ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०८ धावा केल्या. यानंतर, विल्यमसनने डाव पुढे नेला आणि त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५ वे शतक झळकावण्यात तो यशस्वी झाला. विल्यमसनने ९४ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांसह १०२ धावा काढल्यानंतर बाद झाला.
NZ’s highest ever ODI total against South Africa. 100s from Rachin Ravindra (107) and Kane Williamson (102), alongside contributions from Daryl Mitchell (49 from 37) and Glenn Phillips (49 from 27). Watch LIVE in NZ on @skysportnz 📺 LIVE scoring | https://t.co/jkQGB3IJ2G 📲 pic.twitter.com/08W0Bp6Hhx
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 5, 2025
डॅरिल मिशेलचे हुकले अर्धशतक –
विल्यमसन आणि रॅचिन बाद झाल्यानंतर टॉम लॅथम चार धावा करून बाद झाला. परंतु, डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी एक शानदार भागीदारी केली आणि संघाचा धावसंख्या ३०० च्या पुढे नेली. मिशेलचे अर्धशतक हुकले. तो ३७ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ धावा काढून बाद झाला. दरम्यान, मायकेल ब्रेसवेलने १२ चेंडूत १६ धावा केल्या. फिलिप्स शेवटपर्यंत खेळत राहिला आणि २७ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ धावांवर नाबाद परतला. कर्णधार मिचेल सँटनर दोन धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर कागिसो रबाडाने दोन आणि वियान मुल्डरने एक विकेट्स घेतली.
केन विल्यमसनच्या १९ हजार धावा पूर्ण –
केन विल्यमसनने सामन्यात त्याच्या डावातील २७ वी धाव पूर्ण करताच मोठी कामगिरी केली. तो आता न्यूझीलंड संघासाठी १९ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विल्यमसनने २०१० मध्ये न्यूझीलंडकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याने ३७० सामने खेळले आहेत. या काळात त्याच्या बॅटने ४४० डावांमध्ये १९०७५ धावा केल्या आहेत. विल्यमसनच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ४८ शतके आणि १०२ अर्धशतके आहेत.





