NZ vs ENG Test Series : न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंडचा कसोटी संघ जाहीर, ‘या’ 21 वर्षीय युवा खेळाडूला प्रथमच मिळाली संधी…

England Test Squad for New Zealand Tour : इंग्लंडने मंगळवारी (29 ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. इंग्लंडला 28 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडमध्ये तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. पाकिस्तान दौऱ्यावर संघाचा भाग असलेला जेमी स्मिथ इंग्लंड संघासोबत न्यूझीलंडला जाणार नाही. त्याच्या जागी 21 वर्षीय जेकब बेथेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. 24 वर्षीय स्मिथने आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी पितृत्व रजा घेतली आहे. त्याऐवजी जॉर्डन कॉक्स यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.
कसोटी मालिकेसाठी 21 वर्षीय फलंदाज अष्टपैलू जेकब बेथेलचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये बेथेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पाच एकदिवसीय आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आक्रमक फलंदाजीसोबतच तो फिरकी गोलंदाजीही करतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीने बेथेलने इंग्लंडच्या निवडकर्त्यांना प्रभावित केले. तो सध्या इंग्लंडच्या पांढऱ्या चेंडू संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे.
अलीकडेच पाकिस्तान दौऱ्यावर झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंड संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलसाठी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील मालिका महत्त्वाची आहे. न्यूझीलंडने या मालिकेत क्लीन स्वीप केल्यास ते WTC फायनलच्या शर्यतीत पोहोचू शकतात. मात्र, यासाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. तसेच न्यूझीलंड संघाने भारताविरूध्द मुंबई कसोटी जिंकली आणि त्यानंतर इंग्लंडला 3-0 ने पराभूत केले, तर ते WTC फायनल खेळणार हे जवळपास निश्चित होईल. इंग्लंडचा संघ WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर विजय किंवा पराभवामुळे त्याच्या संधींवर कोणताही फरक पडणार नाही.
Next Test stop: New Zealand ✈
Thoughts on our squad? 🏏
🇳🇿 #NZvENG 🏴 #EnglandCricket pic.twitter.com/WnUHhrgx3d
— England Cricket (@englandcricket) October 29, 2024
न्यूझीलंड मालिकेसाठी इंग्लंडचा कसोटी संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (यष्टिरक्षक), झॅक क्रॉली, बेन डकेट, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, हॅरी ब्रूक, जो रूट, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, शोएब बशीर, जेकब बेथेल.
इंग्लंडचा न्यूझीलंड दौरा 2024
दोन दिवसांचा सराव सामना : न्यूझीलंड 11 विरुद्ध इंग्लंड 11, 23-24 नोव्हेंबर 2024, सर जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन
पहिली कसोटी : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर २०२४, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च
दुसरी कसोटी: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, 6-10 डिसेंबर 2024, बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
तिसरी कसोटी: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, 14-18 डिसेंबर 2024, सेडन पार्क, हॅमिल्टन





