शाब्बास! ‘एनएसएस’चे विद्यार्थी करणार करोनामुक्तीसाठी सर्वेक्षण

पुणे – करोना नियंत्रणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने “माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत मोहिम सुरू ठेवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्य संपर्क अधिकाऱ्यांनी प्रत्येक विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्थांनाही “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या मोहिमेद्वारे मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीतून जनजागृती करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पत्रानुसार स्वयंसेवक व विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून सर्वेक्षणामध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. विद्यार्थ्यांची व त्यांच्या कुटुंबाची व इतर कमीक कमी 10 ते 20 कुटुंबाची माहिती विद्यापीठाच्या एनएसएसच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरणे आवश्यक आहे, असे “एनएसएस’चे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
कुटुंब सुरक्षित असल्याबाबतचे सर्वेक्षण करावे. सुरक्षित नसल्यास आजारी व्यक्तींचे विलगीकरण कसे केले आहे, याची माहिती संकलित करावी. कुटुंबाना सजग करण्यासाठी ई-मेल, व्हॉट्सऍप, सोशल मीडियाद्वारे जनजागृती मोहीम राबवावी, असा सूचना डॉ. देसाई यांनी पुणे, नगर, नाशिकमधील प्राचार्य, संचालकांना दिल्या आहेत.



