“लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन, असे गळा फोडून सांगणारे आता…”; फडणवीसांवर राऊतांची खोचक टीका

Sanjay Raut on Devendra Fadnavis | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा मिळवणाऱ्या भाजपला आता केवळ 9 जागा मिळाल्या आहेत. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या आहेत.
यात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारूण पराभव झाला आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली.
ते म्हणाले की, “नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु माझी विनंती आहे, मला विधानसभेकरिता पूर्णवेळ काम करायचे असून, मला सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे,” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. Sanjay Raut on Devendra Fadnavis |
मी पुन्हा येईन…पुन्हा येईन..
लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन
असे गळा फ़ोडूनसांगणारे
आता:
मला जाऊदे ना घरी
वाजले की बारा
अशी रेकॉर्ड लावत आहेत.
छान
महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणारनाही.
अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत
जय महाराष्ट्र!@BJP4Mumbai… https://t.co/RY0bm96tHQ— Sanjay Raut (@rautsanjay61) June 6, 2024
संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका
संजय राऊत यांनी ट्विट करत लिहिले की, “मी पुन्हा येईन… पुन्हा येईन.. लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असे गळा फोडून सांगणारे आता मला जाऊ दे ना घरी, वाजले की बारा, अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान… महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत. जय महाराष्ट्र!” असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडू नये, यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सगळ्यांचं जे काही यश-अपयश आहे, ती आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हंटलंन आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी आता त्यांची प्रतिक्रिया ऐकली. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. काही आता जी निवडणूक झाली त्यामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर मविआला जागा जास्त मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. सगळ्यांचं जे काही यश-अपयश आहे, ती आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असंच समजतो. आम्ही टीम म्हणून हे काम केलं आहे.”
“राज्यात देखील खूप चांगलं काम झालेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, आम्हाला पुढे देखील राज्यासाठी एकत्र काम करायचं आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी नक्की बोलेन आणि राज्यासाठी एकत्र काम करु. आम्ही एकत्र काम केलं आणि निवडणुकांचे जे निकाल आले ती आमची सर्वांची जबाबदारी आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा:
नवा विक्रम रचला..! इंदूरमध्ये भाजप विरोधात पहिल्यांदाच NOTA ला मिळाली 2 लाखांहून अधिक ‘मते’





