आता शिंदे गटाचे चिन्हही अडचणीत; शिंदे गटाच्या ‘ढाल-तलवार’ ला शीख समाजाचा आक्षेप ; आयोगाला पाठवले निवेदन

नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना निवडणूक आयोगाकडून नुकतेच नवीन पक्ष आणि चिन्ह देण्यात आले आहे. मात्र यांच्या पक्ष चिन्हावर आता वाद होण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण शिंदे गटाच्या ढाल-तलवार या चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले असल्याचे म्हटले जात जात आहे. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते नाकारले याप्रमाणे ढाल-तलवार हेदेखील खालसा पंथाचे धार्मिक प्रतीक आहे, त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगाने द्यायला नको होते. या संदर्भातील निर्णय नाही झाला तर रणजीत सिंह न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला मिळालेली नवीन चिन्हं वादात सापडली आहेत. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे. तर शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हाला शीख समाजाने विरोध केला आहे खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतं जुळतं असल्यानं त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केली आहे. तसं, निवेदनही त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.





