आता सरकार म्हणतंय जुलै-ऑगस्टपासून लसीकरणाचा वेग वाढवणार

अहमदाबाद – देशातील लसीकरणाचा वेग येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यांपासून वाढवला जाणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. वास्तविक 1 मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. पण लसींच्या पुरवठ्याअभावी हे लसीकरण बंद पडले.
त्यानंतर सरकारने 21 जूनपासून सर्वांना मोफत लस दिली जाण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून पूर्ण वेगाने हे लसीकरण केले जाण्याची अपेक्षा होती. पण अमित शहा यांनी पुढील महिन्या दोन महिन्यांनी हे लसीकरण पूर्ण वेगाने सुरू होईल असे म्हटले आहे.
अमित शहा हे आज पत्रकारांशी बोलत होते. लसीकरणाचा हा वेग जुलै-ऑगस्टपासून वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे असे ते म्हणाले. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत संपूर्ण देशातील लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशीही घोषणा सरकारने या आधी केली आहे.




