काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन पुण्यात ११ व १२ ऑगस्टला; पक्षातील गळती रोखण्यासाठी रणनिती ठरणार
पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनिती ठरवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन येत्या ११ व १२ ऑगस्टला पुण्यात होणार आहे. सिंहगड रस्त्यावरील गोर्हे बुद्रुक येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये हे अधिवेशन पार पडेल.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, त्यानंतर नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीचा हा पहिलाच मोठा मेळावा आहे. या अधिवेशनात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रणनिती ठरणार आहे.
पुणे जिल्ह्यातील काही माजी आमदार आणि नगरसेवकांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील गळती रोखण्याच्या दृष्टीने अधिवेशनात कोणती धोरणात्मक पावले उचलली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. अधिवेशनाच्या तयारीसाठी प्रदेश निरीक्षक गणेश पाटील यांनी सोमवारी काँग्रेस भवनात बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.





