Chief Minister Devendra Fadnavis : उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका निवडणुकीसाठी दाखल करताना मोठ्या आश्चर्यकारण घडामोडी घडल्या. आता अर्जाची छाननी झाली असून, काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यामुळे इच्छा असूनही अशांना निवडणूक लढण्यास मुकावे लागणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार तयारी केली असून तगडे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील काही दिवसांमध्ये अंदाजे 40 ते 45 सभा घेणार आहेत. भाजपला ही निवडणूक महत्वाची असल्याने तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महापालिका निवडणुकीतही त्याच पद्धतीने किंबहुना त्याहूनही चांगली कामगिरी करण्यावर भाजप विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. प्रत्येक महापालिकेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्वच महापालिकांवर कमळ फुलविण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे. निवडणूक होण्याअगोदरच भाजपला ३ विजय मिळाले आहेत. त्यामुळे साहजिकच आत्मविश्वास अधिक वाढला असून, त्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना धाडण्यात आलेले आहेत. राज्यातील काही महत्वाच्या शहरांवर भाजपचे विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. या महापालिकांवर विशेष लक्ष देणार मोठ्या महापालिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंदाजे तीन ते चार सभा घेणार आहेत. या महापालिकांमध्ये मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर इतर महापालिकांसाठी एक सभा फडणवीसांची होणार आहे. यासाठी आत्तापासून तयारीला सुरूवात झाली असून, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रचाराचा पहिला नारळ कुठे फोडणार? ज्या ठिकाणी फडणवीसांच्या तीन ते चार सभा होणार आहेत. त्या सर्वच महापालिका निवडणुकीत भाजप आणि मित्रपंक्षांना मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी घालून दिलेल्या वेळापत्रकानुसार ३ जानेवारीपासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असून, मुख्यमंत्री फडणवीस कोणत्या महापालिकासाठी पहिला प्रचाराचा नारळ फोडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या पंधरा दिवसात सभांचा धडाका सुरू राहणार असून उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री स्वतःत मैदानात उतरणार आहेत. हेही वाचा : पुणे-लोणावळा लोकलला ४७ वर्षे! तरीही तिसरी-चौथी मार्गिका कागदावरच; प्रवाशांचे हाल