Manoj Jarange : आता आरपारची लढाई! मनोज जरांगेंनी घेतला कठोर निर्णय; म्हणाले ” माझा बळी गेला तर..”
Manoj Jarange : आमच्यावर गुन्हे दाखल होतात, पण आंदोलनावेळी हल्ले करणाऱ्या पोलिसांवर कारवाई का होत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केले.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने ३० मेपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला आहे.
आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या या आंदोलनाबाबत पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “यावेळी उपोषण अत्यंत कठोर असेल. रणरणत्या उन्हात खाटेवर बसून उपोषण करणार आहे. माझा बळी गेला तर त्याला सरकार आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,” असा इशारा त्यांनी दिला. (Manoj Jarange)
यावेळी बोलताना त्यांनी आंदोलनाच्या स्वरूपाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. “मी मंडपाखाली सावलीत उपोषण करणार नाही. पाणीही पिणार नाही,” असे सांगत त्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई आंदोलनानंतर सरकारला तब्बल दहा महिने वेळ दिला, मात्र जाणूनबुजून आरक्षणाचा निर्णय लांबवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा : Deepali Sayyad : “करिअर संपवू…”; दिपाली सय्यद यांना धमकीचे फोन; एकनाथ शिंदेंची भेट घेणार
सरकारला आरक्षण द्यायचे नसेल तर आंतरवालीत कोणीही येऊ नये, असे आवाहन करत त्यांनी देशात कधीही झाले नसेल इतके कठोर उपोषण करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, सरकारकडून चर्चेची तयारी दर्शवली जात असली तरी मनोज जरांगे यांनी चर्चेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “चर्चा करून काय उपयोग? आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात का? आमची मतं घेतात, पण आरक्षण देत नाहीत. आमच्यावर गुन्हे दाखल होतात, पण आंदोलनावेळी हल्ले करणाऱ्या पोलिसांवर कारवाई का होत नाही?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले. (Manoj Jarange)
तसेच, “ओबीसींसाठी मंत्रालय स्थापन करण्यात आले, मग कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय का नाही?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा : Menstrual Hygiene Day: मासिक पाळी आणि समाजाची ‘वैचारिक स्वच्छता’!






