Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला २९ मेपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अन्यथा ३० मेपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. (Maratha Reservation) गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील सातत्याने या मागणीवर ठाम भूमिका घेत असून सरकारवर दबाव वाढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. या सर्व घडामोडींनंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “मी पदाला चिकटून बसणाऱ्यांपैकी नाही. माझ्या राजीनाम्याने मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होत असेल, तर मी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायलाही तयार आहे,” असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. (Maratha Reservation) अडीच लाख कुणबी दाखले दिल्याचा दावा मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने मोठे काम केल्याचा दावा करत विखे पाटील म्हणाले की, “मी उपसमितीचा अध्यक्ष झाल्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत तब्बल अडीच लाख दाखले वितरित करण्यात आले आहेत.” स्थानिक पातळीवरील अडचणी सोडवण्यासाठी सर्व आमदारांना पत्र पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. “स्थानिक समस्या संबंधित आमदारांनी पुढाकार घेऊन सोडवायला हव्यात. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत,” असेही ते म्हणाले. (Maratha Reservation) सरकार कुठेही कमी पडलेलं नाही सातारा गॅझेटची अंमलबजावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे मान्य करताना विखे पाटील यांनी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. पुणे विभागीय आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाला असून अंतिम अंमलबजावणी बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे सरकार कुठेही कमी पडलेले नाही,” असेही विखे पाटील यांनी म्हटले. (Maratha Reservation) लवकरच जरांगेंची भेट घेणार मनोज जरांगे पाटील यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. “आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती त्यांना देईन. काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करेन,” असे ते म्हणाले. दरम्यान, विखे पाटील यांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून आता मनोज जरांगे यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maratha Reservation)