नवी दिल्ली – विविध बैठकांमुळे राजकारण ढवळून निघाले असतानाच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही आज डिजिटल बैठक बोलावली आहे. त्यामध्ये पक्षाचे सरचिटणीस आणि प्रदेश शाखांचे प्रभारी सहभागी होणार आहेत. तर या सोबतच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू व झारखंडचे मुख्यमंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मोदी सरकारच्या विरोधात देशव्यापी निदर्शने करण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे समजते.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियांनी बोलावलेल्या डिजिटल बैठकीत मोदी सरकारला घेरण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहचवण्याचा कॉंग्रेसचा इरादा असल्याचे पक्षाच्या सुत्रांनी सूचित केले.
तसेच पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडून कडवे आव्हान उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
प्रामुख्याने इंधन दरवाढीवरून निदर्शने छेडण्याची कॉंग्रेसची योजना आहे. या मुद्द्याबरोबरच करोना संकट, पेगासस हेरगिरी वाद, राजकीय स्थिती, अर्थव्यवस्था, शेतकरी आंदोलन महागाईच्या मुद्द्यावर सरकारच्या विरोधात विरोधकांची एकजूट पाहावयास मिळाली.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या डिजिटल बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.