“आता अनेकांची तोंडे बंद होतील”; ललित पाटीलच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

पुणे – ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याबाबत आज मला जी माहिती देण्यात आली ती आता माध्यमांसमोर सांगू शकत नाही. मात्र, या प्रकरणात मोठे नेक्सेस (प्रकरणातील संबधितांची नावे) समोर येईल आणि अनेकांची बोलणारी तोंड बंद होतील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
आम्ही पोलिसांना ड्रग्ज रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस दलाचे सर्व युनिट कामाला लागले आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांना नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्याची माहिती मिळाली. त्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला असून, ड्रग्ज उत्पादक आणि विक्रींवर कारवाई सुरूच ठेवून ड्रग्ज माफियांची लिंक मोडीत काढायची आहे, असे फडणवीस म्हणाले. “मी पळालो नाही, मला पळवले आहे’ या ललित पाटीलच्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता, फडणवीस म्हणाले, आता सगळ्या गोष्टी बाहेर येणार आहेत.
आता ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो यापेक्षा जे ड्रग्जचं जाळं बाहेर येणार आहे त्यावरून अनेकांची तोंडे बंद होणार आहेत. यावेळी ससून रुग्णालयातील कैद्यांना दिलेली मुदतवाढ, चुकीचे प्रमाणपत्र याबाबत विचारल्यावर त्या आरोपांची चौकशी सुरू आहे. तसेच अन्य चौकशांमध्ये जे दोषी आढळतील, त्या कुणालाही सोडणार नाही. सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट शब्दांत फडणवीसांनी सांगितले.
जागावाटप प्रश्नी चर्चा नाही
खासदारांच्या 22 जागांबाबत विचारणा केली असता, देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही चर्चा आणि बैठक झाली नाही, कोणी काहीही मागितलेले नाही. जागांबाबत आम्ही बसून ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ, तुम्ही चिंता करू नका असे सांगितले. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी प्रश्न करताच फडणवीस त्यावर काहीही न बोलता पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.





