महाजनादेश यात्रेनंतर आता भाजपचे महासंकल्प अभियान

मतदारराजाचा कौल जाणून घेणार; नवमहाराष्ट्राचे संकल्प
सातारा, वाईत स्वबळाची चाचपणी
सातारा जिल्ह्यात भाजपच्या महत्त्वाकांक्षा उघड झाल्या आहेत. सातारा व वाई या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघांवर दावा सांगणाऱ्या भाजपकडून स्वबळाची चाचपणी केली जात आहे. मतदारराजाचा कौल काय असेल, याचा अंदाज संकल्पनाम्यातून घेतला जाणार आहे.
सातारा – महाजनादेश यात्रेनंतर भाजपकडून जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचण्यासाठी दि. 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महासंकल्प अभियान राबवले जात आहे.
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मतदारराजाचा संकल्प काय आहे, याची माहिती संकलित करण्याचे काम प्रत्यक्षात 25 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. स्व. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महासंकल्प अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. हे
अभियान बूथ स्तरावर चालणार असून प्रदेश, जिल्हा, मंडल, शक्ती केंद्र व बूथ स्तरावरील कार्यकर्ते घरोघरी जाऊन नवमहाराष्ट्राचे नऊ संकल्प पोहोचवणार आहेत.
या संदेशांचे मुख्यमंत्र्यांसाठी संकलन केले जाणार आहे. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी “प्रभात’ला दिलेल्या माहितीनुसार महासंकल्प अभियान चार टप्प्यांत राबवले जाणार आहे. 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान अभियानाच्या पत्रकाचे भाजप सदस्यांना वितरण, 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान बूथ प्रमुखांच्या बैठका, 25 सप्टेंबरला राज्य स्तरावर अभियानाची सुरुवात व 2 ऑक्टोबरपासून लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांचे व्यापक संपर्क अभियान सुरू होणार आहे. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पत्र व नवसंकल्प मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहेत. पत्रकाच्या तळात जनतेच्या संदेशासाठी जागा देण्यात आली आहे. संदेश वहन करणाऱ्या सदस्याने 9227192271 या क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे.प्रदेश कार्यालयातून या अभियानाची माहिती घेतली जाणार आहे.





