Paris Olympics 2024 (Tennis) : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावलं आहे. यासह त्याने स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा पराभव करून विम्बल्डन 2024 मधील पराभवाचा बदला देखील घेतला आहे. जोकोविचने रोमहर्षक (Novak Djokovic vs Carlos Alcaraz) लढतीत अल्काराझचा 7-6(3), 7-6(2) असा पराभव केला. अशाप्रकारे जोकोविचने कारकिर्दीत प्रथमच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी अल्काराझला टेनिसमधील सर्वात तरुण ऑलिम्पिक चॅम्पियन बनण्याची संधी होती, पण त्याला अपयश आले.
नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सुवर्णपदक सामन्यात कार्लोस अल्काराजचा 2-0 ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे. विम्बल्डनच्या अंतिम फेरीतही हे दोघे आमनेसामने होते. त्यावेळी कार्लोस अल्काराजने विम्ब्लडनमध्ये जोकोविचचा पराभव केला होता. आज जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकत ‘त्या’ पराभवाचा बदला घेतला आहे.
Novak Djokovic. Olympic Champion 🥇
Career Golden Slam Completed. #Paris2024 pic.twitter.com/QdGZnFQ9Xh
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 4, 2024
टेनिस एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोविचने कार्लोस अल्काराझचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात पराभव केला. या विजयासह नोव्हाकने टेनिस आणि ऑलिम्पिक इतिहासात अनेक विक्रम केले आहेत. 37 वर्षीय नोव्हाक जोकोविच हा ऑलिम्पिक इतिहासातील ओपन एरामध्ये सुवर्णपदक जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
नोव्हाक जोकोविचने 24 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत पण पॅरिस गेम्सपूर्वी त्याच्या नावावर ऑलिम्पिक सुवर्णपदक नव्हते. त्यामुळेच त्याने स्पेनच्या कार्लोस अल्काराझविरुद्ध विजयासाठी चिवट झुंज दिली. नोव्हाक आणि अल्काराझ यांच्यातील स्पर्धा किती खडतर होती, याचा अंदाज यावरून लावता येतो की दोन्ही खेळाडू सर्व्हिस मोडू शकले नाहीत. दोन्ही सेट टायब्रेकमध्ये गेले, जे नोव्हाक जोकोविचने जिंकले. शेवटी हा सामना नोव्हाक जोकोविचवर 7-6(3), 7-6(2) असा आपल्या नावावर केला.
अशी कामगिरी करणारा ठरला पाचवा खेळाडू…
या विजयासह नोव्हाक जोकोविच जगातील असा पाचवा खेळाडू ठरला आहे की ज्याने चारही ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत आणि त्याच्या नावावर ऑलिम्पिक सुवर्णपदकही आहे. जोकोविचच्या आधी केवळ स्टेफी ग्राफ, आंद्रे अगासी, राफेल नदाल, सेरेना विल्यम्स यांनाच ही कामगिरी करता आली. आता या चार खेळाडूंसह नोवाकचे नाव आता करिअर ग्रँडस्लॅम विजेत्यांच्या यादीत आले आहे. चारही ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याच्या कामगिरीला करिअर गोल्डन स्लॅम म्हणतात.
बऱ्याच दिवसांपासून ऑलिम्पिक पदकाची आस…
1988 नंतर ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा जोकोविच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. 24 ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या जोकोविचला बऱ्याच दिवसांपासून ऑलिम्पिक पदकाची आस होती. त्याने इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीचा पराभव करून आपल्या पहिल्या ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला. अव्वल मानांकित जोकोविचला मागील तीन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीतूनच माघारी परतावे लागले होते. जोकोविचला बीजिंग(2008)मध्ये राफेल नदाल , लंडन (2012)मध्ये अँडी मरे , टोकियो (2021)मध्ये अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनी ऑलिम्पिक सेमीफायनलमध्ये पराभूत केले होते. 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले होते.