पिंपळे गुरव – जुनी सांगवी येथील काटेपुरम चौक येथील काळुराम मारुती जगताप बॅडिमिंटन हॉल येथे करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र महापालिकेच्या वतीने सुरू केले आहे. परंतु सकाळी उशिरापर्यंत केंद्रावर वैद्यकीय कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच वैद्यकीय विभागाने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
जुनी सांगवी येथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी सर्वांना नोटीस काढल्या आहेत. तसेच सर्वांना उशिरा उपस्थित राहण्याचा खुलासा करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर पुढील कारवाई सुरू आहे. जुनी सांगवी येथील लसीकरण केंद्रावर डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी साडेअकरापर्यंत उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केंद्राची पाहणी केली असता स्टाप अडीच तास जागेवर नव्हता तसेच कामाला सुरुवातही केली नव्हती. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. वैद्यकीय विभागाने संबंधितांवर कारवाई न केल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजू सावळे यांनी दिला आहे.