लक्षवेधी : औषधांबाबत ठोस सुधारणांची गरज

– वरुण गांधी
निर्यात बाजारातील औषधांचे नियम आणि भारतीय औषधे कुचकामी किंवा हानिकारक असल्याच्या घटनांमुळे फार्मा क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. औषधांच्या गुणवत्तेच्या बाबतीत निष्काळजीपणा धोकादायक आहे. यामुळे जगात भारताच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर फार्मा क्षेत्रात ठोस नियामक सुधारणांची गरज आहे.
भारत हा जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा उत्पादक आहे. जागतिक फार्मा मार्केटमध्ये भारताचा वाटा 13 टक्के आहे. भारतातून 200 पेक्षा जास्त देशांना औषधांचा पुरवठा होतो. लसींच्या बाबतीत आपला जागतिक वाटा 60 टक्के आहे. या माध्यमातून भारत जगभरातील गरिबांच्या जीवनात परिवर्तनाच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकत आहे. फार्मा क्षेत्राच्या विकासासाठी उद्योजकांनी दीर्घकाळ संघर्ष केला आहे. परंतु निर्यात बाजारातील औषध नियम आणि भारतीय औषधे कुचकामी किंवा हानिकारक असल्याच्या अपमानास्पद घटनांमुळे या क्षेत्राला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकतीच गुणवत्ता मानकांची पूर्तता करण्यात 48 औषधे अयशस्वी ठरली आहेत. भारतीयांनी उच्च रक्तदाब, ऍलर्जी आणि बॅक्टेरियाच्या संसर्गासाठी नियमितपणे घेतलेल्या सर्व औषधांपैकी जवळपास तीन टक्के औषधे नियामक निरीक्षकांच्या नमुना चाचण्यांमध्ये निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे.
गेल्या फेब्रुवारीमध्ये ग्लोबल फार्मा हेल्थकेअर, तामिळनाडू या कंपनीला अमेरिकेत निर्यात केलेल्या आय ड्रॉप्सची संपूर्ण बॅच परत मागवणे भाग पडले. कारण या आयड्रॉप्समुळे डोळ्यांना हानी पोहोचण्याची शक्यता दिसून आली. मेरियन बायोटेक या कंपनीने देशात बनवलेले कफ सीरप 2022 मध्ये गांबिया आणि उझबेकिस्तानमधील बालमृत्यूंना कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. तथापि, भारतीय औषध नियामकाने असा कोणताही संबंध नाकारला. तसेच या औषधांच्या नमुना चाचणीत कोणतेही विषारी पदार्थ आढळले नाहीत, असे स्पष्टपणाने सांगितले. औषधांच्या गुणवत्तेच्या समस्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही परिणाम असू शकतात. काही वेळा ऍझिथ्रोमाइसिनसारखे सामान्य औषध कमी प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(डीजीसीआय)ने 20 राज्यांमधील 76 कंपन्यांची तपासणी केल्यानंतर 18 फार्मा कंपन्यांचे उत्पादन परवाने रद्द केल्यामुळे, केंद्र सरकार औषधांचा दर्जा सुधारण्यासाठी पावले उचलत असल्याचे दिसून आले आहे. तथापि, आणखी बरीच पावले उचलणे आवश्यक आहे.
यादरम्यान, जागतिक नियामकांकडूनही कारवाई सुरू आहे. नोव्हेंबर 2019 ते गेल्या नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या निवडक तपासणीत असे आढळून आले आहे की, कर्करोगाशी संबंधित आणि इन्सुलिन औषधांच्या निर्मितीमध्ये सूक्ष्मजैविक दूषित होण्यापासून रोखण्यासाठी प्रस्थापित कार्यपद्धतीचे काही मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्यांकडून पालन केले जात नाही. खासकरून बुरशीपासून बचाव करण्याच्या पद्धती अंमलात आणल्या जात नाहीत. औषधांच्या गुणवत्तेच्या बाबतीत असा निष्काळजीपणा धोकादायक आहे. यामुळे जगात भारताच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो.
जानेवारी 2020 मध्ये हिमाचल प्रदेश-आधारित डिजिटल व्हिजन निर्मित कफ सीरप घेतल्याने जम्मूमध्ये 12 मुलांचा मृत्यू झाला. त्या औषधात डायथिलीन ग्लायकोल आढळले. गुणवत्ता चाचणीत अयशस्वी होऊनही, विविध राज्ये आणि केंद्रीय औषध प्रयोगशाळांनी 19 वेळा डिजिटल व्हिजनला मंजुरी दिली. या घटनेनंतर हिमाचल प्रदेशच्या राज्य नियामकालादेखील जागेच्या तपासणीदरम्यान औषधांच्या फॉर्म्युलेशनमध्ये गुणवत्तेत दोष आढळले. सहा महिन्यांनंतर हिमाचल प्रदेशातील एका मुलाचा त्याच कंपनीचे दुसरे उत्पादन सेवन केल्याने मृत्यू झाला. मार्च 2021 मध्ये चाचणी एजन्सींना आणखी एका औषधात सक्रिय घटकाची पातळी कमी असल्याचे आढळून आले. असे असतानाही औषध कंपनीवरची कारवाई फारशी प्रभावी ठरलेली नाही. अशा प्रकरणांमध्ये औषध निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणे आव्हानात्मक होते. देशात 36 औषध नियंत्रक असूनही अशा घटना घडत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर फार्मा क्षेत्रात ठोस नियामक सुधारणांची गरज आहे. यासाठी सर्व फार्मा उत्पादकांच्या प्रभावी देखरेखीसाठी औषधांच्या केंद्रीकृत डेटाबेसला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य मंत्रालय ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स ऍक्ट (1940) मध्ये सुधारणा करू शकते. राज्यांनी परवानगी दिल्यास देशाच्या 36 प्रादेशिक नियामकांना एकाच नियामकाच्या कक्षेत एकत्र आणले जाऊ शकते. यामुळे स्थानिक आणि राज्य स्तरावरील नियामक प्रक्रियेवर परिणाम होण्याचा धोका कमी होईल. नियामकांच्या सक्षमीकरणासाठी राज्यांमध्ये सामान्य औषधांसाठीच्या मानकांची देखील आवश्यकता आहे. देशात 10 हजार पेक्षा जास्त औषध उत्पादन युनिट्स आहेत. या सर्वांचे नियमन करणे म्हणजे देखरेखीची मोठी जबाबदारी आहे. भूतकाळात झालेल्या नियमित चाचण्यांमधून केवळ सक्रिय घटकांच्या कमतरतेवर बोट ठेवण्यात आले. 2013 मध्ये, तामिळनाडूमध्ये ग्लिपिझाइड हे अँटीऍलर्जी औषध केवळ वापरायोग्य नसल्याचे घोषित करण्यात आले. राज्य औषध नियंत्रकांच्या अधिपत्याखालील तपासणी पथकांना बळकट करण्यासाठी आणि तपासणी कालावधी कमी आणि नियमित करण्यासाठी अतिरिक्त अर्थसंकल्पीय साहाय्य आवश्यक आहे.
भारतात बनवल्या जाणाऱ्या औषधांवरील जागतिक विश्वास वाढवण्यासाठी नियामक प्रक्रिया पारदर्शक आणि प्रभावी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, मागील काळातील नियामकीय आणि गुणवत्ता उल्लंघनांचा डेटाबेस देखील सार्वजनिक केला पाहिजे. ड्रग रिकॉलवरील एखाद्या राष्ट्रीय कायद्याचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. हा प्रस्ताव 1976 पासून प्रलंबित आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनची वैधानिक शक्ती वाढवली पाहिजे. त्यासाठी औषधे आणि सौंदर्य प्रसाधने (सुधारणा) विधेयक, 2013 च्या धर्तीवर एक विधेयक तयार केले जावे आणि एक स्वतंत्र संस्था म्हणून केंद्रीय औषध प्राधिकरण तयार करण्यासाठी मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
जगप्रसिद्ध असणाऱ्या भारतीय फार्मास्युटिकल उद्योगाने साध्या जेनेरिक औषधांच्या उत्पादनापलीकडे जात दर्जेदार जेनेरिक आणि नावीन्यपूर्ण औषधांच्या निर्मितीकडे वळले पाहिजे. इक्वेडोर, पनामा आणि नायजेरियासारख्या देशांनी अलीकडेच भारतीय जेनेरिक औषधांमध्ये रुची दाखवली आहे. भारत सरकारने शून्य दोषांसह “मेक इन इंडिया’चा दावा केला आहे. त्याच धर्तीवर देशाच्या औषध उद्योगाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला दृढतेने पुढे जावे लागेल.





