दखल : अदृश्य संकटाची चाहूल
तापमानवाढीच्या (Temperatures) चर्चेत सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न केंद्रस्थानी आणण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात आपणाकडून केवळ पाण्याचे किंवा जमिनीचेच नव्हे, तर पर्यावरणाच्या या अदृश्य आधारस्तंभांचेही अपरिमित नुकसान होईल.

– प्रा. डॉ. सागर गावंडे
Temperatures : तापमानवाढीच्या (Temperatures) चर्चेत सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न केंद्रस्थानी आणण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात आपणाकडून केवळ पाण्याचे किंवा जमिनीचेच नव्हे, तर पर्यावरणाच्या या अदृश्य आधारस्तंभांचेही अपरिमित नुकसान होईल.
आपण तापमानवाढीचे (Temperatures) चटके प्रत्यक्ष अनुभवत आहोत. अंगाची लाही लाही करणारे ऊन, कोरडे पडलेले तलाव, दिवसेंदिवस खोल जात असलेल्या विहिरी आणि पाण्यासाठी वणवण भटकणारे लोक हे चित्र आता अपवादात्मक राहिलेले नाही; ती आपल्या काळाची वास्तवता बनली आहे. मात्र या दृश्यमान संकटामागे आणखी एक गंभीर आणि अदृश्य संकट आकार घेत आहे. ते म्हणजे मातीत, पाण्यात आणि भूजलाच्या प्रत्येक थेंबात वसलेल्या सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वावरील घोंगावणारा धोका.
पृथ्वीवरील जीवनाचा पाया असलेल्या माती आणि पाण्यामध्ये असंख्य सूक्ष्मजीव वास्तव्य करतात. हे सूक्ष्मजीव आकाराने नगण्य असले तरी पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सेंद्रीय पदार्थांचे विघटन, पोषकद्रव्यांचे पुनर्चक्रण, वनस्पतींच्या वाढीस चालना, जलशुद्धीकरण आणि जैवविविधतेचे संवर्धन या अनेक नैसर्गिक प्रक्रिया त्यांच्या अखंड कार्यामुळेच शक्य होतात. थोडक्यात, निसर्गाच्या चक्राला गतिमान ठेवणारे हे अदृश्य शिल्पकार आहेत.
वाढते तापमान, घटती आर्द्रता, आटत चाललेले जलस्रोत आणि भूजलाचा अनियंत्रित उपसा यामुळे या सूक्ष्मजीवसृष्टीसमोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी कोरड्या पडताना किंवा तलावांचा तळ उघडा पडताना आपण पाहतो; परंतु त्याचवेळी नष्ट होत असलेल्या असंख्य सूक्ष्मजीवांचे मौन मृत्यू आपल्या लक्षातही येत नाहीत. हीच या संकटाची सर्वात भयावह बाजू आहे.
कारण या अदृश्य जीवसृष्टीचा र्हास म्हणजे पर्यावरणीय प्रक्रियांची गती मंदावणे, जमिनीची सुपीकता कमी होणे आणि जलस्रोतांची नैसर्गिक पुनर्निर्मिती क्षमता खिळखिळी होणे. आज तापमानवाढीविरुद्धच्या (Temperatures) लढ्यात आपण वृक्षलागवड, जलसंधारण वाढवणे तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देत आहोत, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र त्याचबरोबर माती आणि पाण्यातील सूक्ष्मजीवसृष्टीचे संरक्षण हा देखील पर्यावरणीय धोरणाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. कारण निसर्गाचा समतोल केवळ डोळ्यांना दिसणार्या घटकांवरच अवलंबून नसतो; तो या अदृश्य जीवसाखळीवरही तितकाच आधारलेला असतो.
सूक्ष्मजीवांचे पर्यावरणातील योगदान
सामान्यतः सूक्ष्मजीव म्हटले की लोकांच्या मनात रोग निर्माण करणार्या जीवांची प्रतिमा तयार होते. परंतु वास्तवात बहुसंख्य सूक्ष्मजीव हे मानव आणि पर्यावरणासाठी उपयुक्त असतात. मातीतील सूक्ष्मजीव मृत प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अवशेष विघटित करून त्यातील पोषक घटक पुन्हा मातीमध्ये उपलब्ध करून देतात.
या प्रक्रियेमुळे कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस यांसारख्या घटकांचे नैसर्गिक चक्र अखंडित राहते. सूक्ष्मजीवांशिवाय पृथ्वीवर जैविक कचर्याचे प्रचंड ढीग साचले असते. अनेक बुरशी आणि जीवाणू वनस्पतींच्या मुळांशी सहजीवन निर्माण करून त्यांना पोषणद्रव्ये आणि पाणी मिळविण्यास मदत करतात. काही जीवाणू वातावरणातील नायट्रोजन थेट वनस्पतींसाठी उपयुक्त स्वरूपात बदलतात. ही प्रक्रिया शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जलस्रोतांमधील सूक्ष्मजीवदेखील प्रदूषकांचे विघटन करून पाण्याची नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया चालू ठेवतात. त्यामुळे सूक्ष्मजीवांची संख्या आणि विविधता कमी होणे म्हणजे संपूर्ण पर्यावरणीय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेत घट होणे होय.
जमिनीची आर्द्रता : सूक्ष्मजीवांचे जीवनाधार
जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी आर्द्रता म्हणजे जीवनरेखा आहे. मातीतील बॅक्टेरिया, बुरशी, अॅक्टिनोमायसेट्स, प्रोटोझोआ आणि इतर सूक्ष्मजीव पाण्याच्या सूक्ष्म थरांमध्ये राहतात. त्यांची वाढ, हालचाल, अन्न मिळविण्याची क्षमता आणि पुनरुत्पादन या सर्व प्रक्रिया आर्द्रतेवर अवलंबून असतात. जेव्हा तापमान वाढते आणि जमिनीतील ओलावा कमी होतो, तेव्हा सूक्ष्मजीवांच्या क्रियाशीलतेत मोठी घट होते.
काही सूक्ष्मजीव सुप्त अवस्थेत जातात, तर काहींचा मृत्यू होतो. परिणामी मातीतील जैविक प्रक्रिया मंदावतात. सेंद्रिय पदार्थांचे विघटन कमी होते आणि पोषकद्रव्यांचे पुनर्चक्रण प्रभावित होते. कृषी क्षेत्रात याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवू शकतात. मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव नायट्रोजन स्थिरीकरण, फॉस्फरस उपलब्धता आणि वनस्पतींच्या मुळांशी सहजीवन यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची संख्या कमी झाल्यास पिकांची उत्पादकता घटू शकते आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व वाढू शकते.
पाण्यातील मासे, कीटक, शैवाल आणि इतर सूक्ष्मजीव यांच्यासाठीही ही परिस्थिती घातक ठरते. अनेक संवेदनशील प्रजाती कमी ऑक्सिजनमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर जातात. काही ठिकाणी जलस्रोतांमध्ये हानिकारक शैवालांची वाढ होते, ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावते आणि जैवविविधतेवर परिणाम होतो. याशिवाय, अनियमित पाऊस आणि दीर्घकालीन दुष्काळी परिस्थितीमुळे भूजल पुनर्भरणाची प्रक्रिया मंदावते. परिणामी जमिनीतील ओलावा कमी होत जातो. हा ओलावा कमी होणे म्हणजेच सूक्ष्मजीवांच्या जीवनचक्रावर थेट आघात होय.
सूक्ष्मजीव विविधतेला धोका
पर्यावरणातील प्रत्येक सूक्ष्मजीव विशिष्ट तापमान, आर्द्रता आणि पोषक परिस्थितीत उत्क्रांत झालेला असतो. तापमानात अचानक वाढ झाल्यास अनेक प्रजाती टिकून राहू शकत नाहीत. काही उष्णतारोधक जीव वाढतात, तर संवेदनशील जीव कमी होतात. यामुळे सूक्ष्मजीव समुदायाची रचना बदलते. जैवविविधता कमी झाल्यास पर्यावरणीय प्रक्रियांमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट पोषकद्रव्याच्या पुनर्चक्रणासाठी जबाबदार असलेली प्रजाती नष्ट झाल्यास त्या संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.






