दखल : पालक व्हा, मालक नाही?

– डॉ. सुभाष राठोड
पालक जर मालक झाले, तर मुलं हरवतात. पण पालक जर मित्र, मार्गदर्शक आणि विश्वासू सहकारी झाले, तर मुलं बहरतात, फुलतात, उंच उडायला शिकतात. म्हणूनच पालक व्हा, मालक नाही.
आजच्या काळात शिक्षण हे मुलांसाठी सर्वांगीण विकासाचं साधन न राहता स्पर्धेचं रणांगण बनलं आहे. नीट, जेईई सारख्या परीक्षांचं दडपण, त्यावर पालकांच्या महत्त्वाकांक्षांचं ओझं आणि त्यात मुलांच्या भावना, स्वप्नं, हक्क या सगळ्यांचा श्वास गुदमरतो आहे.
अनेक पालक शिक्षणात केलेल्या खर्चाचं रूपांतर ‘गुंतवणूक’ समजून ‘गुणांचा परतावा’ मागतात. पण हे समीकरण जेव्हा माणुसकीवरच बेततं, तेव्हा त्याचे परिणाम भयावह होतात, कधी आत्महत्या, तर कधी एक आयुष्यभराचं मनोविकाराचं सावट.
नीट, जेईई सारख्या कठीण परीक्षांच्या शर्यतीत, वडिलांनी मुलीच्या खांद्यावर आपल्या अपेक्षांचं ओझं टाकलं आणि तिच्या मनाला न विचारता तिला त्या मार्गावर चालायला लावलं. तेही कोणी सामान्य वडील नव्हते, मुख्याध्यापक होते. त्यांनी तिच्यासाठी महागडा क्लास लावला. सराव चाचणी परीक्षेत अपेक्षित गुण न आल्याने त्यांचा राग अनावर झाला.
मी भरमसाठ पैसे खर्च करतोय, मग गुण तर हवेच, अशी ‘गुंतवणूक-परतावा’ ही बाजारू भाषा त्यांनी आपल्या लेकरासाठी वापरली. लेकीनेही प्रश्न विचारला, ‘तुम्ही अभ्यास केला होता का? तुम्ही कलेक्टर झाला नाही ना, शिक्षकच झाला आहात!’ तिचं हे प्रत्युत्तर वडिलांच्या अहंकाराला टोचलं आणि तेव्हा सुरू झाला अमानुषपणाचा तांडव.
त्यांनी तिला अमानुषपणे मारहाण केली. त्या निष्पाप पोरीचा प्राण निघून गेला होता. या घटनेने अंतर्मन हादरले. काळजाचा ठोका चुकला. मन उदास झाले. शब्द हरवले, भावना सुन्न झाल्या.
हल्लीच्या काळात पालक-लेकरांमधील नातं समजुतीच्या आधारावर न टिकता, अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरताना दिसत आहे. अनेक पालक आपल्या मुलांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर अपूर्ण महत्त्वाकांक्षांचं ओझं लादताना दिसतात. माझं लेकरू डॉक्टरच व्हायला हवं, इंजिनिअरच व्हावं ही मानसिकता इतकी खोल रुतली आहे की, त्या कल्पनांच्या भोवर्यात मुलांचं स्वतंत्र अस्तित्वच हरवून जातं.
या विचारातून निर्माण होते ती अव्याहत स्पर्धा, जिथं यशाची व्याख्या फक्त मार्कांमध्ये आणि करिअरच्या गोंडस नावांमध्ये मर्यादित केली जाते. परिणामतः मुलांच्या मनावर असह्य दडपण येतं आणि त्यांच्या कोवळ्या भावविश्वात असुरक्षिततेची छाया गडद होत जाते. शिक्षण ही व्यक्तिमत्त्व निर्मितीची प्रक्रिया न राहता, ती यशाच्या खुर्चीसाठीची चढाई ठरते, जी नात्यांनाच गिळंकृत करू लागली आहे.
पालकत्व म्हणजे पाठराखण, समजूत आणि प्रेमाचा हात असायला हवा; पण आज ते अधिकतर वेळा यशाचा ठेकेदार होऊ पाहतं. हे वास्तव समाजमनाला खडबडून जागं करणं अत्यावश्यक झालं आहे. पालक त्यांच्या मतांचा, भावना, आवडीनिवडींचा विचार करत नाहीत. पालकांना वाटतं आपण पैसे खर्च करतो, मग निर्णयही आपलेच असतील! मुलांचं आयुष्य, शिक्षण, शाळा, अभ्यासक्रम, करिअर सगळं काही पालकच ठरवतात.
मुलांना केवळ पालकांच्या अपेक्षांचं मशीन समजलं जातं. त्या यंत्रासारख्या वागवल्या जाणार्या मुलांनी अपेक्षेप्रमाणे गुण मिळवलेच पाहिजेत, टॉपर राहिलेच पाहिजे अशी हट्टाची धारणा केली जाते, पण हेच मशीन जर यंत्रणेच्या दबावात अडकलं, तर त्याचा विस्फोट पालकांच्या लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो.
अनेक पालक आपल्या अपूर्ण आकांक्षा मुलांकडून पूर्ण करून घेऊ पाहतात. महागडे क्लासेस, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा या सगळ्यांचा उद्देश आपली सामाजिक प्रतिष्ठा टिकवणे असतो. त्यात मुलांच्या क्षमतेचा, त्यांच्या भावनांचा विचारच होत नाही. मार्क्स मिळाले नाहीत, की बिनशर्त प्रेमाचं नातं तुटतं. पालक मुलांवर पैसे लावतात आणि अपेक्षा करतात की त्या बदल्यात गुण मिळालेच पाहिजेत. ही गुंतवणूक-परतावा मानसिकता मुलांना माणूस न समजता प्रॉडक्ट समजते.
दहावी, बारावीमध्ये गुण मिळाल्यानंतरही अनेकांना नीट किंवा जेईई परीक्षेत अपयश येतं. या परीक्षांची तयारी करताना मुलांच्या मनावर प्रचंड दबाव असतो. प्रत्येक प्रश्न, प्रत्येक चूक, प्रत्येक सराव पेपर ही जणू परीक्षा नव्हे, तर शिक्षेची चौकट वाटते. घरातही तोच ताण, तोच अपेक्षेचा भार. संवाद हरवतो. हसणं विरतं. मौन वाढतं. पालकांना मुलांच्या आतल्या कोलाहलाची जाणीव होत नाही.
ते पाहतात गुण, पण ओळखत नाहीत त्या मागचं गोंधळलेलं मन. राजस्थानमधील कोटा हे या सगळ्याचं जिवंत उदाहरण आहे. तिथे हजारो पालक आपल्या मुलांना पाठवतात, टॉपर्स बनण्यासाठी. पण अनेक मुलं नैराश्यात अडकतात. आत्महत्या करतात. त्यांचं आयुष्य कागदावर लिहिलेल्या गुणांपेक्षा खूप मोठं असतं, पण ते कुणाच्या लक्षात येत नाही. कोटासारखी ठिकाणं मुलांचं रक्त, घाम आणि अश्रूंनी व्यापली आहेत.
या सगळ्यामागे मूलभूत प्रश्न आहे, आपलं पालकत्व आपण समजून घेतलं आहे का? पालक होणं म्हणजे एक हक्क नव्हे, ती एक जबाबदारी आहे. मुलं आपली असतात, पण त्यांचं भविष्य आपल्यासारखं असावं ही अपेक्षा चुकीची आहे. खलिल जिब्रान म्हणतात, ‘मुलं तुमच्यापासून आली असली, तरी ती तुमची नाहीत. ती काळाच्या ओघातली अपत्यं आहेत. मुलांना स्वातंत्र्य, व्यक्तिमत्त्व, आत्मसन्मान हे सर्व मिळायलाच हवे. त्यांचं अस्तित्व स्वतंत्र आहे. त्यांच्यावर आपल्या अपयशाचं ओझं टाकणं म्हणजे त्यांचं बालपण गिळंकृत करण्यासारखे आहे.
आपण समाज म्हणून पालकत्वाची जबाबदारी घेत आहोत का? प्रत्येक शाळेत समुपदेशक असायला हवा. पालकांसाठी मार्गदर्शन शिबिरे असायला हवीत. शैक्षणिक व्यवस्थेने मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. पण त्याहीपेक्षा आधी पालकांनी स्वतःमध्ये बदल घडवायला हवा. मुलांचं यश ही आपल्या पालकत्वाची परीक्षा नाही. त्यांचं अपयश ही आपली लाज नाही. प्रेम देणं, समजून घेणं आणि त्यांच्या प्रवासात सहभागी होणं हेच पालकत्व आहे.





