दखल : ग्रोसरी अॅपचे वाढते जाळे

– प्रसाद पाटील
भारतीय ग्राहकांच्या बदलत्या सवयीचा ङ्गटका लहान दुकानदारांना बसत आहे. आता एक पिशवी दूध देखील अॅपवरून मागविले जात आहे. गल्लीतील दुकानदार अशा अॅपचा मुकाबला करू शकत नाही.
मुंबईत एका भागात एका ङ्गूड अॅपच्या वेअरहाउसमध्ये काम करणार्या लोकांच्या कामाचा वेग हा काही सेकंदात मोजला जातो. उशीर झाला तर स्क्रीनवर लाल दिवा लागतो. दहा मिनिटांत ऑर्डर पॅक करून पाठविली जाते. परिणामी बाहेर उष्णतेच्या झळा सहन करत डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेण्यासाठी सज्ज असतो. त्यांना देखील तातडीने डिलिव्हरी करायची असते. त्या वेअरहाउसच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, ऑर्डर पिकअप करण्याचे काम दीड मिनिटात होणे अपेक्षित आहे.
संपूर्ण भारतात प्रसार
भारतात एका ङ्गूड अॅपच्या वेअरहाउसची साखळी तयार होत आहे. या वेअरहाउसमध्ये दुधापासून केळीपर्यंत आणि निरोधपासून गुलाबाची ङ्गुले असे सर्वकाही घरपोच वितरित केले जाते. हे भारतातील किराणा बाजाराचे नवीन चित्र आहे. या चित्रात एकीकडे तंत्रज्ञान आणि ङ्गुललेला आर्थिक बाजार दिसत आहे तर दुसरीकडे हताश झालेले किरकोळ दुकानदार. अनेक काळापासून गल्लोगल्ली ते चौकात किराणा दुकान चालविणार्या मालकांना आपला व्यवसाय डोळ्यादेखत ठप्प पडताना दिसत आहे. अगोदरच मॉल आणि सुपरमार्केटने त्यांचे ग्राहक काढून घेतलेले असताना आता दहा मिनिटांतच घरबसल्या सामान देणार्या अॅपने त्यांची डोकेदुखी वाढविली आहे.
भारतात ई कॉमर्सचा बाजार हा दिल्ली ते गल्ली म्हणजे शहरातील प्रत्येक घरात पोचत आहे. पूर्वी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक सामानापर्यंतच सेवा देत होत्या. या कंपन्या दुसर्या दिवशी किंवा चोवीस तासांत सामान पोचवत होत्या. मात्र ङ्गूड अॅप्स जसे स्विगी, झेप्टो, ब्लिंकिटसारख्या कंपन्या दहा मिनिटांतच डिलिव्हरी या नावावर ई कॉमर्सचा चेहरामोहरा बदलत आहेत.
बिग मार्केट
गेल्या एप्रिल महिन्यात अमेरिकी बँक गोल्डमन सॅक्सने म्हटले, भारतात क्विक ई कॉमर्स मार्केट हे सुमारे पाच अब्ज डॉलरचे झाले आहे आणि ते देशातील एकूण ग्रोसरी बाजाराच्या म्हणजे 11 अब्ज डॉलरच्या 45 टक्के आहे. गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत या मार्केटची व्याप्ती 60 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. स्विगीने 2014 पासून ङ्गूड डिलिव्हरीचे काम सुरू केले. कंपनीचे मूल्य आजघडीला 10 अब्ज डॉलर एवढे झाले आहे. आता कंपनी भारतात वेगाने डिलिव्हरी करण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. त्याचा उद्देश चीन आणि अमेरिकेनंतर भारताला तिसर्या क्रमाकाची किरकोळ बाजारपेठ म्हणून नावारुपास आणणे. गेल्यावर्षी स्विगीच्या एका अहवालाचा संदर्भ देत रॉयटर्सने एक लेख लिहिला.
त्यात म्हटले, स्विगी आपल्या ङ्गूडपेक्षा मार्केटच्या व्याप्तीवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यांच्या कागदपत्रानुसार कंपनी 21 ते 35 वयोगटातील शहरी नागरिकांवर लक्ष केंद्रित करत आहे. कारण या वयोगटाकडे वेळ कमी आहे. कंपनीने गेल्या वर्षी देशभरात आपल्या वेअरहाउसची संख्या दुप्पट करत एकूण 25 शहरांत 500 केली. एका अधिकार्याच्या मते, कंपनीचा उद्देश एप्रिल 2025 मध्ये भारतात 750 वेअरहाउस सुरू करणे, हा आहे.
भारतीय ग्राहकाचे वेगळेपण
करोना काळानंतर संपूर्ण जगात क्विक ई कॉमर्सचा बाजार वेगाने वाढला. मात्र नंतर काही महिन्यांतच घरपोच डिलिव्हरीची क्रेझ कमी झाली. या कारणांमुळे अनेक स्टार्टअप बंद पडले. भारतात वातावरण वेगळे आहे. कन्सल्टन्सी ङ्गर्म किअर्नीतील भागीदार समुत चोप्रा म्हणतात, भारतात वेअरहाउस स्वस्त असून ग्राहकांची आवड देखील वेगळ्या रूपात दिसून येते. भारतात ग्राहकांना शेजारच्या दुकानातून ङ्गोन करून सामान मागविण्याची सवय आहे. कधी कधी तर दोन ते चार गोष्टी घरबसल्या मागवल्या जातात. या सवयीला स्विगीने चांगलेच हेरले आहे. ते एक डझन आंब्याची देखील ऑर्डर घेतात. त्याचवेळी बाजारात प्रत्यक्षपणे आंबा खरेदी केला तर त्याची िंकमत निम्म्यापेक्षा कमीच असते. परंतु अनेकांना वेळ वाचवायचा असतो. नोकरदार तरुण घरातील किराणा सामान भरण्यासाठी स्विगी आणि झेप्टोसारख्या अॅप्सचा वापर करतात.
किरकोळ दुकानदारांना ङ्गटका
ग्राहकांच्या बदललेल्या सवयींचा ङ्गटका किरकोळ दुकानदारांना बसत आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत एका भागात किरकोळ दुकान चालविणार्या दुकानदाराचा अलीकडच्या काळात व्यवसाय मंदावला. त्यामुळे त्याने दुकानाचे नूतनीकरण केले. एसी देखील बसविला, मात्र ग्राहकांची अजूनही पाठच दिसते. कधीकाळी दररोज 50 हजार रुपयांची उलाढाल करणारा हा दुकानदार आता दररोज 25 हजार रुपयांची उलाढाल करत आहे. मॉल आणि सुपरबाजारातून दूध आणि ब्रेड कोणीही खरेदी करत नव्हते. हाच आमचा व्यवसाय होता, असे तो दुकानदार म्हणतो. परंतु अॅप्सने सगळा घोळ केला.
भारतीय रिटेलर असोसिएशन चार राज्यांत सुमारे 90 टक्के दुकानदारांचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या मते, या दुकानदारांच्या मासिक विक्रीत सुमारे 10 ते 60 टक्के घट झाली. आता अनेक दुकानदार आपले अस्तित्व वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेत आहेत. उदाहरणार्थ, गुजरातचे रिटेल असोसिएशनचे अध्यक्ष हिरेन गांधी यांच्या म्हणण्यानुसार, किराणा दुकानदारांनी ग्राहकांचे व्हॉटसअॅप ग्रुप तयार करावेत आणि सहा किलोमीटरच्या आत घर असणार्यांना घरपोच सेवा द्यावी. गांधी सांगतात, सुमारे 500 दुकानदारांनी यानुसार कृती केली तर ते आपला व्यवसाय वाचवू शकतात.
600 अब्ज डॉलरची उलाढाल
भारतात दहा ते पंधरा मिनिटांत किराणा सामान पोचवण्याचे प्रस्थ वाढत असून या सुविधेचा अनेकजण लाभ उठवत आहे. या कारणांमुळेच भारतात क्विक कॉमर्सची उलाढाल 2025 पर्यंत 15 पटीने वाढू शकते आणि तो 515 अब्ज डॉलरपर्यंत पोचू शकतो, असा अंदाज आहे. देशात किराणा बाजार 600 अब्ज डॉलरचा आहे आणि त्यात अधिकाधिक वाटा उचलण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. अॅमेझॉन, वॉलमार्ट, फ्लिपकार्ट आणि रिलायन्स कंपनी यांच्यात मार्केटवर ताबा मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. मार्केट रिसर्च कंपनी ‘रेडिसिअर’च्या मते, भारतात क्विक कॉमर्ससाठी 45 अब्ज डॉलरची बाजारपेठ उपलब्ध असून शहरी भागात त्याचा बाजार मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांच्या जीवावर सुरू आहे.
‘रेडिसिअर’चे समन्वय व्यवस्थापक अभिषेक गुप्ता म्हणतात, भारतात वेगाने वाढणार्या मार्केटवर ताबा मिळवण्यासाठी सुनियोजितपणे वाटचाल सुरू आहे. ऑनलाइन खरेदीचा वाढता व्यवहार पाहता स्टोअरमध्ये खरेदीच्या तुलनेत ऑनलाइनवर अधिक भर दिला जात असल्याने हा बाजार वाढत आहे. या क्षेत्रात अनेक स्टार्टअप कंपन्या आहेत. यात ब्लिंकिट आणि झेप्टोने नवीन दुकान सुरू केले आणि मोठ्या प्रमाणात भरती केली. या दोन्ही कंपन्या दहा मिनिटांतच डिलिव्हरी करण्याची हमी देतात.
क्विक कॉमर्सचे मूल्य प्रामुख्याने ग्राहकाची खरेदी शैली आणि किरकोळ बाजारातील वेगाने वितरण करण्याचा पर्याय (किमान दहा मिनिटे) यावर अवलंबून असून यात अनेक सुविधायुक्त खरेदीचा अनुभव ग्राहकांना प्रदान केला जात आहे. अहवालात म्हटले, क्विक कॉमर्स आपल्या ग्राहकांच्या गुप्त गरजा देखील पूर्ण करत असून संबंधित ग्राहक पारंपरिक बाजारात उघडपणे खरेदी करण्यास बिचकत असतो. लोकांना हवे ते देण्याची तयारी अॅप्सकडून केली जात आहे. डिलिव्हरीसाठी त्यांना अनेक आठवडे वाट पाहावी लागत नाही. अहवालात म्हटले, क्विक कॉमर्सची सुविधा आणि स्पिड पाहता ग्राहक या सेवेला कशामुळे पसंती देतात, हे कळते. गेल्या दोन वर्षांत शहरी भागात क्विक कॉमर्समध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. यात प्रमुख शहरे बंगळुरू, चेन्नई आणि दिल्लीतील बहुतांश व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घेतलेला दिसून येतो.





