US Iran war – अमेरिकेबरोबरचे युद्ध थांबवणे आणि इराणच्या बंदरांची नाकाबंदी उठवल्यास होर्मूझ सामुद्रधुनी खुली केली जाईल, या इराणच्या नवीन प्रस्तावाला अमेरिकेकडून थंड प्रतिसाद मिळतो आहे. हा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाकडून स्वीकारला जाण्याची शक्यता नसल्याचे दिसते आहे. आता पहिल्यांदा युद्ध थांबवून होर्मूझ सामुद्रधुनी खुली केल्याने अण्वस्त्रांबाबतची चर्चा लांबणीवर पडेल. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारला जाऊ शकत नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. जो काही करार केला जाईल, त्याद्वारे कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखले जायला हवे, असे रुबिओ म्हणाले. पाकिस्तानकरवी इराणने आपला प्रस्ताव अमेरिकेकडे पाठवल्यानंतर त्याबाबत अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचाय राष्ट्रीय सुरक्षा पथकाने या प्रस्तावाचा विचार केला आणि त्यावरील अंतिम निर्णय स्वतः ट्रम्प नंतर जाहीर करतील, असे व्हाइट हाउसच्यावतीने सांगण्यात आले. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोमवारी रशियामध्ये जाऊन अध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली आणि त्यांच्याशीही सध्याच्या घडामोडींविषयी चर्चा केली. मात्र या बैठकीत पुतीन यांनी इराणला कोणती मदत करण्याची तयारी दाखवली आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले ! मंगळवारी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील चक्रा, तेबनीन आणि काफरा या गावांवर हवाई हल्ले केले. ड्रोन हल्ल्यात मन्सूरी गावात एका मोटरसायकललाही लक्ष्य करण्यात आले. संभाव्य जीवितहानीबद्दल तात्काळ कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. हिजबुल्लाह दक्षिण लेबनॉनमधील इस्रायली सैन्यावर हल्ले करण्यासाठी रहिवासी वस्त्यांचा वापर करत असल्याचे कारण देऊन इस्रायलच्या लष्कराने दक्षिणेकडील १६ गावांतील रहिवाशांना स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. त्याचवेळी हा हल्ला झाला. दरम्यान इराणसाठी हेरगिरी करणे आणि इराणी हल्ल्यांना पाठिंबा दिल्याप्रकरणी बहरीनने ३० जणांना जन्मठेप आणि १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याची टीका मानवी हक्कविषयक कार्यकर्त्यांनी केली आहे. दक्षिण गाझामध्ये मंगळवारी इस्रायली गोळीबारात एका ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती नासेर रुग्णालयाने दिली.