Kangana Ranaut – Chirag Paswan: ‘रोमांस असता तर आज आमची मुलं असती’; चिराग पासवानसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर कंगना रणौतचं स्पष्टीकरण
Kangana Ranaut - Chirag Paswan:

Kangana Ranaut – Chirag Paswan: बॉलिवूडची ‘क्वीन’ आणि भाजप खासदार कंगना रणौत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि कंगना यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. मात्र, आता स्वतः कंगनाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून, “आमच्यात रोमांस असता तर आज आमची मुलं असती,” असे खळबळजनक विधान करत या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
संसदेतील भेटीनंतर चर्चांना उधाण –
२०२४ मध्ये संसदेच्या आवारात कंगना रणौत आणि चिराग पासवान यांची भेट झाली होती. यावेळी दोघांमधील मैत्रीपूर्ण संवाद आणि काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या फोटोंमुळे नेटिझन्सनी त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा सुरू केल्या होत्या. ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला या ‘रोमांस’बद्दल विचारले असता तिने अत्यंत स्पष्टपणे आपली बाजू मांडली.
तो फक्त माझा चांगला मित्र – कंगना
कंगना म्हणाली, “छे, असे काहीही नाही. चिराग माझा खूप जुना आणि चांगला मित्र आहे. आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो. १० वर्षांपूर्वी आम्ही ‘मिले ना मिले हम’ हा चित्रपट एकत्र केला होता. जर आमच्यात खरोखर रोमांस असता, तर आज आम्हाला मुलं असती. जर मला रोमांस करायचा असता, तर तो आतापर्यंत झाला असता. पण आमच्यात तसे काहीही नाही.”
चिरागबद्दल अधिक बोलताना कंगना म्हणाली, “जेव्हा मी त्याला भेटते, तेव्हा मला एका जुन्या मित्राची आठवण येते. तोदेखील फिल्म इंडस्ट्रीतून आला आहे, त्यामुळे आमच्यात एक वेगळ्या प्रकारचे मैत्रीचे नाते आहे. मला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते, पण तो केवळ एक मित्र आहे.”
राजकीय आणि व्यावसायिक पार्श्वभूमी –
कंगना रणौत सध्या हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपची खासदार आहे, तर चिराग पासवान हे बिहारच्या हाजीपूरचे खासदार असून जून २०२४ पासून केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटातून चिरागने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यात कंगना त्याची नायिका होती.
कंगनाचे आगामी चित्रपट –
कंगना अलीकडेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसली होती. आता ती ‘भारत भाग्य विधाता’ या नवीन प्रकल्पावर काम करत असून, या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. तसेच, आर. माधवनसोबत ती एका सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातही झळकणार आहे.





