Chirag Paswan: चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पक्ष राज्यातील सर्व 403 विधानसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली. पूर्व उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राजीव पासवान यांनी स्पष्ट केले की, केंद्रात भाजपसोबत त्यांचा एनडीएत गठबंधन आहे, मात्र उत्तर प्रदेशात कोणतेही आघाडीचे समीकरण नसणार आहे. उत्तर प्रदेश प्रथम, उत्तरप्रदेशवाले प्रथम “UP First, UP Wale First” या भूमिकेसह पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. दरम्यान, राजीव पासवान यांनी विरोधकांवरही टीका केली. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी ‘पीडीए’च्या नावाखाली वंचित समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप केला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका करत, सत्तेत असताना त्यांनी कांशीराम यांना भारतरत्न का दिले नाही, असा सवाल उपस्थित केला. हेही वाचा – ममता बॅनर्जी की भाजप, पश्चिम बंगालमध्ये यावेळी कोण स्थापन करणार सरकार? राजीव पासवान म्हणाले की, काँग्रेसच्या काळातच भीमराव आंबेडकर यांना दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. पक्ष संस्थापक रामविलास पासवान यांच्या कामांच्या आधारे आम्ही जनतेमध्ये जात असून, पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचाही दावा त्यांनी केला. सध्या बिहार आणि केंद्रात लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) हा भाजपसोबत सत्तेत सहभागी असून, चिराग पासवान केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत, तर बिहार सरकारमध्येही पक्षाचे मंत्री आहेत. चिराग पासवान कोण आहेत? चिराग पासवान हे तरुण आणि उदयोन्मुख राजकारणी आहेत. ते लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)चे राष्ट्रीय अध्यक्ष असून, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग पासवान बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. ते सध्या बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात वडिलांच्या पक्षातूनच केली. ते सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणूनही कार्यरत आहेत. तरुण मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे. ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ हा त्यांचा प्रमुख राजकीय नारा आहे. उत्तर प्रदेशात पक्षाचे किती बळ – उत्तर प्रदेशात चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) बळ सध्या मर्यादित मानले जाते. हा पक्ष मुख्यतः बिहारकेंद्रित असून, यूपीमध्ये त्याची संघटनात्मक उपस्थिती कमी आहे. 2022 विधानसभा निवडणुकीत पक्षाने सुमारे 21 जागांवर उमेदवार दिले, मात्र एकही जागा जिंकता आली नाही आणि मतांची टक्केवारी अत्यंत कमी (सुमारे 0.01%) राहिली. उत्तर प्रदेशात निवडणूका कधी आहेत? सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत ? उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका साधारण फेब्रुवारी–मार्च 2027 दरम्यान होण्याची शक्यता आहे. सर्व 403 जागांसाठी मतदान होईल. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण 403 जागा आहेत. सध्याचे पक्षीय बल – भारतीय जनता पक्ष (BJP) – 257 आमदार सहयोगी पक्ष (अपना दल, RLD, निषाद इ.) – सुमारे 37 NDA एकूण – सुमारे 294 आमदार समाजवादी पक्ष (SP) – 101 काँग्रेस (INC) – 2 विरोधी आघाडी (INDIA) – सुमारे 103 आमदार इतर (JD(L), BSP इ.) – 3 रिक्त जागा – 3 यूपीमध्ये सध्या भाजप-नेतृत्वाखालील एनडीएची मजबूत सत्ता आहे. समाजवादी पक्ष मुख्य विरोधी पक्ष आहे. पुढील निवडणूक 2027 मध्ये होणार असून, तेव्हा सत्तेचा मोठा बदल होऊ शकतो.