महायुतीत बिनसलं.! ‘आमचीदेखील युती तोडण्याची तयारी…’; भाजपकडून शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर

मुंबई – ‘राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा; तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू’,ठाणंपण आमचं, कोकणंपण आमचंच, जिथे युती आहे तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हीच लढणार, असे लोकसभेला पाहिले. असे असेल तर युती तोडा आणि तुमचं तुम्ही लढा असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले.
याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. युती तोडायची असेल तर आमचीदेखील तयारी आहे, असे प्रत्युत्तर भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले. रामदास कदमांसारख्या वरिष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणं अपरिपक्व आहे. शिंदे-फडणवीसांसोबत बसून हा प्रश्न सोडवता आला असता. रविंद्र चव्हाणांबद्दल पहिलं तुम्ही बोललात. तक्रार फडणवीसांकडे करायला हवी होती, असे दरेकर म्हणाले.
‘युतीची गरज फक्त भाजपला नाही’
महायुती असताना धर्म पाळायला पाहिजे. भाजपच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता समजून घ्या. नरेश म्हस्के, रविंद्र वायकरला आमच्या कार्यकर्त्यांनी खासदार केलं. युतीची गरज सर्वांना आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आहे. चांगल्या वातावरणात मिठाचा खडा टाकू नये.
उणीधुणी काढली तर आमचीही तयारी आहे. युतीची गरज फक्त भाजपला आहे, असं रामदास कदमांना वाटत असेल तर त्यांचा तो गोड गैरसमज आहे. आमचे कार्यकर्तेदेखील मनावर दगड ठेवून सर्वाला सामोरे जात आहेत, हे रामदास कदमांनी लक्षात ठेवावं, असे दरेकरांनी सांगितले.
कोकणात महायुतीतील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई महामार्गाच्या प्रश्नावरुन सुरु झालेला वाद आता शिवसेना-भाजप युतीतील जागांवर पोहोचला आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा थेट हल्लाबोल रामदास कदम यांनी केलाय. देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली.
तर दापोलीमध्ये भाजप कार्यकर्ते सहकार्य करत नासल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासाठी फडणवीसांकडं तक्रार केल्याचंही त्यांनी म्हटलंय.कोकणातील रस्त्यांवरून रामदास कदम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाहीय.
चाकरमान्यांचे हाल होतायत. समृद्धी महामार्ग 3 वर्षात होतो. मग हा महामार्ग का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. रविंद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. अशी टीका रामदास कदमांनी केली.





