देशाची एक इंच भूमीही जाऊ दिलेली नाही; लोकसभेत सरकारची ग्वाही

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुत्रे स्वीकारल्यापासून देशाची एक इंच भूमीही इतर कुणाच्या ताब्यात जाऊ दिलेली नाही, अशी ग्वाही मंगळवारी सरकारने लोकसभेत दिली.
युक्रेनमधील स्थितीविषयी लोकसभेत झालेल्या चर्चेवेळी बसपचे खासदार श्यामसिंह यादव यांनी चीनी कुरापतींचा मुद्दा उपस्थित केला. भारतीय भूमी थोडी-थोडी करून चीनच्या ताब्यात जात असल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. त्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी आक्षेप घेतला.
आपली भूमी खूप आधीपासून चीन आणि पाकिस्तानने बळकावल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. मी कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही. मात्र, मोदी पंतप्रधान बनल्यापासून देशाची एक इंच भूमीही इतरांच्या ताब्यात गेलेली नाही.
चीनच्या सीमेलगत असणारे अरूणाचल प्रदेशही 100 टक्के सुरक्षित आहे. मी स्वत: अरूणाचलचा रहिवासी आहे. खोटे दावे करून कुणी देशाची दिशाभूल करू नये, असे त्यांनी म्हटले. मोदी सरकारच्या धोरणामुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असा दावाही त्यांनी केला.





