नागालॅंडमधील घटनेबाबत अमित शहांचे लोकसभेत निवेदन; म्हणाले…

नवी दिल्ली -नागालॅंडमध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याच्या घटनेबाबत केंद्र सरकारने खेद व्यक्त केला. त्यासंदर्भातील निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी लोकसभेत दिले. संबंधित घटनेची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नागालॅंडच्या मोन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी बंडखोर समजून नागरिकांवर गोळीबार केला. त्यामध्ये 14 नागरिक मृत्युमुखी पडले, तर 11 जण जखमी झाले. त्यानंतर ग्रामस्थ आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला. त्यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला.
त्यापार्श्वभूमीवर, सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याची घटना गैरसमजुतीतून घडल्याचे शहा यांनी नमूद केले. नागालॅंडच्या मोन भागात बंडखोरांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराला मिळाल्यानंतर मोहीम हाती घेण्यात आली.
त्यावेळी एका वाहनाला थांबण्याचा इशारा सुरक्षा जवानांनी दिला. मात्र, न थांबता ते वाहन आणखी वेगाने निघाले. त्यामुळे वाहनात बंडखोर असल्याच्या संशयातून जवानांनी गोळीबार केला. त्यामध्ये वाहनातील 6 जण मृत्युमुखी पडले. वाहनातून बंडखोर प्रवास करत नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी जवानांना घेरून त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये एक जवान मृत्युमुखी पडला.
जमावाला पांगवण्यासाठी आणि आत्मसंरक्षणासाठी जवानांना गोळीबार करावा लागला. त्यामध्ये 7 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने आसाम रायफल्सच्या छावणीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जवानांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक मृत्युमुखी पडला, असे शहा यांनी सांगितले.





