“दुष्काळ जाहीर न करणे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे”

मुंबई – मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली, पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीतही राज्य सरकारने दुष्काळ जाहीर न करणे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
नाना पटोले म्हणाले, 59 हजार कोटींच्या योजना दिल्याचा ढोल पिटला जात असला तरी हा फक्त आकड्यांचा खेळ आहे. मराठवाड्यात काही हजार कोटींच्या योजना दिल्याचे जाहीर केले, पण त्या प्रत्यक्षात कधी येतील हे सांगता येत नाही. संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या झळा सहन करत आहे, खरीप वाया गेले आहे. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी वाढलेली आहे, जनावरांना चारा नाही, शेतकऱ्याला मोठ्या मदतीची गरज आहे, पण सरकारने त्याकडे लक्ष दिलेले दिसत नाही.
आज जाहीर केलेल्या योजनांमध्ये जास्तीत जास्त योजना या जलसंपदा विभागाच्या दिसतात, हे प्रकल्प दिर्घकालीन आहेत. सध्या मराठवाड्यातील जनतेला काय हवे, ते मात्र सरकारने दिलेले नाही. कृषीमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यातच 168 शेतकऱ्यांनी मागील दिड-दोन महिन्यांत आत्महत्या केल्या आहेत, इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थीती आहे.
पण सरकारने त्यावर काहीही उपाय योजना जाहीर केल्या नाहीत. मराठवाड्यातील तरुण नोकऱ्यांसाठी मुंबई-पुणे सारख्या शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. त्यांच्या रोजगारासाठी राज्य सरकारने ठोस योजना जाहीर केलेली नाही, हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.





