क्रॉस-व्होटिंग नव्हे, इतर आकडे महत्वाचे; तृणमूलचा मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : क्रॉस-व्होटिंगशी संबंधित नव्हे; तर इतर आकडे जास्त महत्वाचे आहेत, असे म्हणत तृणमूल कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधला. त्या पक्षाचे नेते डेरेक ओब्रायन यांनी विविध घटना आणि दिवसांचा संदर्भ देत आकडेवारी पुढे केली. मोदींनी ४ हजार ११७ दिवसांपासून संसदेत प्रश्नाचे उत्तर दिले नसल्याचेही त्यांनी म्हटले.
नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यामध्ये केंद्रातील सत्तारूढ एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर विरोधकांची १५ मते फुटल्याचा दावा एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने केला. त्यावर तृणमूलचे राज्यसभेतील नेते ओब्रायन यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली.
इकडे-तिकडे १५ मते गेल्याचा मुद्दा महत्वाचा नाही. काही महत्वाच्या आकड्यांवरून मोदी सरकारला उत्तरदायी ठरवले जायला हवे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादले. त्या घडामोडीला १५ दिवस झाले. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू होण्याला ८६२ दिवसांचा कालावधी झाला. पश्चिम बंगालसाठीचा मनरेगा निधी रोखण्यात आला. त्याला १ हजार २८२ दिवस उलटले आहेत. लोकसभेला २ हजार २७८ दिवसांपासून उपसभापती नाहीत, असे त्यांनी नमूद केले.





