‘राष्ट्रीय भरती एजन्सीकडून चार वर्षात एकही परिक्षा नाही’; मल्लिकार्जुन खर्गेंची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली – सरकारी नोकर भरतीसाठी मोदी सरकारने चार वर्षांपुर्वी स्थापन केलेल्या नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय भरती एजन्सीने चार वर्षात एकही भरती परीक्षा घेतलेली नाही. त्यामुळे देशातील सरकारी नोकर भरतीवर त्याचा गंभीर परिक्षाम झाला आहे यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संघ-भाजपने देशातील शिक्षण व्यवस्था उद्धवस्त केली असल्याची घणाघातील टीका करून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
एक्सवरील पोस्ट मध्ये खर्गे यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन ते चार वर्षांत आठ कोटी नवीन नोकऱ्यां निर्माण झाल्याचा दावा मोदींनी केला होता. पण भरती एजन्सीतर्फे जर एकही परिक्षा चार वर्षात घेतलीच गेली नसेल तर युवकांना नोकऱ्या कोठून मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
एक्स वरील हिंदीतील एका पोस्टमध्ये खरगे म्हणाले, “नरेंद्र मोदी जी, काल तुम्ही मुंबईत नोकऱ्यांबाबत खोटेपणाचे जाळे विणत होता. नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सीची घोषणा करताना तुम्ही काय बोलले होते ते मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देऊ इच्छितो.ऑगस्ट २०२० मध्ये तुम्ही म्हणाला होता एनआरए ही यंत्रणा देशातील कोट्यावधी तरुणांसाठी वरदान ठरेल. सामायिक पात्रता चाचणीद्वारे, यामुळे पारदर्शकतेलाही मोठी चालना मिळेल’ पण आज प्रत्यक्षात काय स्थिती आहे?
या बाबत आमच्याकडे 3 प्रश्न आहेत – एनआरएने गेल्या ४ वर्षांत एकही परीक्षा का घेतली नाही? एनआरएला १५१७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करूनही ४ वर्षांत आतापर्यंत केवळ ५८ कोटी रुपयेच का खर्च केले गेले आहेत? एसटी, एसटी, ओबीसी आणि आर्थिक मागासांना नोकऱ्या मिळू नयेत म्हणून आणि त्यांना आरक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी म्हणून एनआरए जाणूनबुजून निष्क्रिय ठेवण्यात आले होते का? असे प्रश्न खर्गेंनी मोदींना विचारले आहेत.
खर्गे यांनी आरोप केला की नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए चा वापर फसवणूक, पेपर लीक आणि घोटाळ्यासाठी केला गेला आणि एनआरएला ला कोणतीही परीक्षा घेण्याची परवानगी दिली गेली नाही. भाजप-आरएसएसने शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे आणि तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे काम हाती घेतले आहे, असा आरोप त्यांनी केला.काँग्रेसने याआधीही एनआरएचा मुद्दा उपस्थित केला होता, पण मोदी सरकारने या मुद्द्यावर मौन बाळगले होते, असे खर्गे म्हणाले.
“केंद्र सरकारने 2020 मध्ये तरुणांसाठी सरकारी भरतीसाठी ‘एक देश, एक परीक्षा’ ची घोषणा केली आणि मोठ्या धामधुमीने त्याचे उद्घाटन केले पण गेल्या ४ वर्षांत ५८ कोटी रुपये खर्च करूनही ही एजन्सी एकही परीक्षा घेऊ शकलेली नाही, एनआरएही एनटीएप्रमाणेच अपयशी ठरले आहे, असा दावा जयराम रमेश यांनीही केला आहे.





