उत्तर कोरियाच्या टेहळणी उपग्रहाचे प्रक्षेपण अपयशी

सेऊल (साऊथ कोरिया) – उत्तर कोरियाने टेहळणी उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी प्रक्षेपित केलेल्या रॉकेटचा अल्पावधीतच स्फोट झाल्यामुळे हे प्रक्षेपण अपयशी ठरले आहे. सोमवारी हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता. मात्र काही क्षणातच त्याचा स्फोट झाला. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दुसरा टेहळणी उपग्रह अवकाशात सोडण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेला यामुळे तडा गेला आहे.
चीन, दक्षिण कोरिया आणि जपानच्या प्रमुख नेत्यांची पहिली त्रिपक्षीय बैठक सेऊलमध्ये झाल्यानंतर लगेचच उत्तर कोरियाने या टेहळणी उपग्रहाच्या प्रक्षेपणाची घोषणा केली होती. दक्षिण कोरिया आणि जपानने नेहमीच उत्तर कोरियाच्या हालचालींबाबत धोका व्यक्त केला होता. मात्र उत्तर कोरियाचा मित्र देश असलेल्या चीनला देखील उत्तर कोरियाच्या हालचालींबाबत असुरक्षितता वाटावी, हे अस्वाभाविक आहे.
उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्राने लांब पल्ल्याच्या रॉकेटच्या वापरावर निर्बंध घातले असताना हा उपग्रह प्रक्षेपित करण्याचे धाडस उत्तर कोरियाने दाखवले होते. याबद्दल जपान आणि दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाची खरडपट्टी देखील काढली होती.
देशाच्या वायव्येकडील मुख्य अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचे प्रक्षेपण केले गेले होते. प्रक्षेपणानंतर थोड्याच वेळात पहिल्या टप्प्यात असतानाच रॉकेटचा स्फोट झाला. इंजिनमधील समस्येमुळे हा स्फोट झाला असावा, असा संशय उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने व्यक्त केला आहे.
या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी लिक्विड ऑक्सिजन पेट्रोलियम इंजिन विकसित करण्यात आले होते. या इंजिनच्या कार्यप्रणालीतील समस्येमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक संशय असल्याचे उत्तर कोरियाच्या नॅशनल एरोस्पेस टेक्नोलॉजी ऍडमिनिस्ट्रेशनच्या उपसंचालकांनी म्हटले आहे.
या उपग्रहाच्या प्रक्षेपणाच्या काही काळ आगोदर जपान सरकारने दक्षिण किनारपट्टीजवळ संभाव्य क्षेपणास्त्र आपत्तीचा इशारा दिला होता. नागरिकांनी सुरक्षित आश्रयामध्येच अथवा इमारतींमध्येच रहावे, असे जपान सरकारने म्हटले होते. उत्तर कोरियानेही सोमवारी जपानच्या तटरक्षक दलांना या प्रक्षेपणाची माहीती दिली होती. कोरियाच्या द्विपकल्पापासून लुझोन बेटापर्यंतच्या समुद्रात सोमवारपासून ३ जूनपर्यंत न जाण्याचा इशारा दिला गेला होता.





