North Korea : उत्तर कोरियाने प्रदर्शित केली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे; लष्करी संचलनाद्वारे केले शक्तिप्रदर्शन

सेऊल : उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी आपल्या लष्करी सामर्थ्याचे जगासमोर शक्तिप्रदर्शन केले आहे. आपल्या अत्याधुनिक शस्त्रांबरोबर लांब पल्ल्यांची आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे देखील जगासमोर आणण्यात आली आहेत. या क्षेपणास्त्रांची चाचणी उत्तर कोरियाकडून या आठवड्याभरात घेतली जाणार आहे. उत्तर कोरियाची सत्तारुढ पर्कर्स पार्टीच्या स्थापनेच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त उत्तर कोरयाची राजधानी प्योंगयोंगमधील मुख्य चौकामध्ये शुक्रवारी एका लष्करी संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही क्षेपणास्त्रे सादर करण्यात आली.
या संचलनामध्ये वासोंग-२० ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे हे सर्वात मोठे आकर्षण होते. आशिया खंडाबरोबर युरोपातील प्रमुख देशांना लक्ष्य करण्याचे सामर्थ्य या क्षेपणास्त्रांमध्ये असल्याने यानिमित्ताने उत्तर कोरियाकडून पश्चिमेकडील देशांना आणि विशेषतः अमेरिकेला एक इशारा देण्यात आला. याशिवाय लघु पल्ल्याची आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि आण्वस्त्रे वाहून नेऊ शकणारी क्षेपणास्त्रे देखील संचलनात सादर करण्यात आली.
या संचलनाला उत्तर कोरियाचे मित्र देश असलेल्या व्हिएतनाम, चीन आणि रशियाचे अधिकारीही उपस्थित होते. आपल्या देशाला असलेले धोके नष्ट करण्यासाठी लष्कराचे सामर्थ्य वाढवण्याचे काम यापुढेही अव्याहतपणे सुरू राहिल, असे किम यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले. रशिया-युक्रेन दरम्यानच्या युद्धात रशियाकडून सहभागी झालेल्या आपल्या सैनिकांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. उत्तर कोरियाने अलिकडे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत. घन इंधनाच्या आधारे रॉकेट इंजिनचा वापर या क्षेपणास्त्रांमध्ये केला गेला आहे, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
परदेशातील अनेक पाहुणे उपस्थित
उत्तर कोरियाच्या लष्करी संचलनासाठी विदेशातून अनेक पाहुणे उपस्थित राहिले होते. यामध्ये चीनचे पंतप्रधान ली कियांग, रशियाचे माजी अध्यक्ष आणि आता मॉस्कोच्या सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव आणि व्हिएतनामी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस तो लाम यांचा समावेश आहे. मोठ्या संख्येने परदेशी पाहुण्यांची उपस्थिती दर्शवून उत्तर कोरियाला एकटे पाडण्याच्या प्रयत्नांना देखील किम यांनी उत्तर दिले आहे.





