शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’! मागण्या मान्य न झाल्यास दहावी-बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य माध्यमिक शाळा-शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळातर्फे शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाही तर दहावी, बारावी परीक्षा व निवडणूक कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशाराही देण्यात आला.शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय दरम्यान मोर्चा काढण्यात आला.
पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, संघटनेचे अध्यक्ष अनिल माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, विना अनुदानित कृती समितीचे खांडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघटनेचे हरिषचंद्र गायकवाड, शिक्षक लोकशाही आघाडीचे शिवाजी कामाथे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शासनाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीला मान्यता दिली तरी त्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही. ही भरती सुरू करावी. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे २४ वर्षानंतरच्या लाभाच्या अनुषंगाने वेतन निश्चिती करावी, नवीन प्रगती योजनेबाबत निर्णय घ्यावा. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी शिक्षक पदाला पात्र असणाऱ्यांना वेतनश्रेणीत पदोन्नती मिळावी, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाल्यास त्यांच्या पदात, वेतनश्रेणीत बदल करू नये आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.शासनाने कर्मचाऱ्यांच्या संयमांचा अंत पाहू नये, असा इशाराही खांडेकर यांनी यावेळी दिला.





