Non-teaching Staff Bharti – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा तब्बल २१ वर्षांनी आता मार्ग खुला केला आहे. यामुळे शाळांमधील कामकाजासाठी आता कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २००५ नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही. त्यानंतर २०१९ चा नवीन आकृतिबंध जाहीर करून शासन गप्प बसले होते. आता २०२६ मध्ये पुन्हा शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी नवीन निकष आणि पात्रतेसंदर्भात महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सुधारणा नियम बनविण्यात आला आहे. याआधारेच ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक यांसारखी पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लिपिकांची १७ हजार ६९५ पदे, वरिष्ठ लिपिकांची ४ हजार ९१२ पदे, मुख्य लिपिकांची ९२३ पदे असतील, तर ग्रंथपालांची २ हजार ११८ पदे, तर प्रयोगशाळा सहायक नववी ते दहावीची ४ हजार ६८५ पदे भरली जातील अशी चर्चा आहे. प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक २ हजार ४० पदेही निर्माण केली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून, कनिष्ठ लिपिक पदासाठी शासनमान्य विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता ग्राह्य धरण्यात येईल. वरिष्ठ लिपिक पदासाठी नियमित वेतनश्रेणीवर कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिकांमधून पदोन्नतीद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक असून, ज्येष्ठता आणि गुणवत्ता यांचा विचार करून पदोन्नती दिली जाईल. मुख्य लिपिक पदासाठी वरिष्ठ लिपिक पदावर किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांमधून पदोन्नती दिली जाणार आहे.