Satara News : कोयना प्रकल्पाचे वरिष्ठ लिपिक शरद शेलार यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

कोयनानगर: कोयना धरण सिंचन विभागातील वरिष्ठ लिपिक शरद शेलार यांनी थकित वेतन मिळाले नसल्याने १० जुलै २०२५ पासून कुंढूर्वाडी येथील उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेलार यांनी नमूद केले की, १० जून २०२५ च्या विभागीय निर्णयानुसार थकित वेतन देण्याचे आदेश असतानाही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.
७५ टक्के दिव्यांग असलेल्या शेलार यांना वैद्यकीय खर्च आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा भार सहन करावा लागत आहे. त्यांच्या बेरोजगार पत्नीला उच्च शिक्षण असूनही नोकरी नाही, तसेच दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्चही त्यांच्यावर आहे. थकित वेतनामुळे आर्थिक आणि मानसिक ताण वाढला आहे.
शेलार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नियोजन मंत्री, पर्यटन मंत्री आणि सातारा पालकमंत्र्यांना निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या निर्णयामुळे कोयनानगरातील प्रशासनासमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे, तर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.





