Nagar | शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी खेवरे यांना उमेदवारी द्या

राहाता, (प्रतिनिधी)– शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी उबाठा शिवसेना पक्षाकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हे योग्य उमेदवार असून त्यांनाच विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी विधानसभा संपर्कप्रमुख उद्धव कुमठेकर यांच्याकडे केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचे राहाता शहर प्रमुख गणेश सोमवंशी तसेच सर्व शिवसैनिकांनी आढावा बैठकीत आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता असल्याने सर्वच मतदारसंघात विविध पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने शिर्डी विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची या संदर्भात बैठक संपन्न झाली.
या बैठकीसाठी शिर्डी विधानसभा संपर्कप्रमुख उद्धव कुमठेकर उपस्थित होते. आढावा बैठकीदरम्यान सर्वांनुमते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना शिवसेना पक्षाने शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, याबाबत शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी खेवरे हे योग्य उमेदवार असून आम्ही सर्व शिवसैनिक त्यांना उमेदवारी द्यावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरणार असल्याची माहिती राहाता शहर शिवसेना प्रमुख गणेश सोमवंशी यांनी दिली.
या बैठकीत शिर्डी संघटक अमोल गायके, शिर्डी समन्वयक सुनील परदेशी, राहाता समन्वय अमोल खापटे, राहाता युवा सेना तालुकाप्रमुख प्रताप निर्मळ, अमित महाले, गोरख वाकचौरे, वाहतूक सेनेचे संदीप सोनवणे, विकास सोमवंशी, प्रसाद पाटील, दीपक टाक, विजय पारधे, आदी पदाधिकाऱ्यांनी उद्धव कुमठेकर यांच्याबरोबर शिर्डी विधानसभा निवडणुकी संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत शिर्डी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना चांगले प्रकारचे मते मिळून दिले आहे.





