Rahata News : केंद्र सरकार हाय हाय! राहाता शहरात मविआचा महागाईविरोधात एल्गार; पाहा काय घडलं?
Rahata News : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले; केंद्र सरकारने तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी.

Rahata News – केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने राहाता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढत्या महागाईचा व गॅस दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.
शेतकरी, कामगार तसेच महिला वर्गावर या महागाईचा मोठा आर्थिक बोजा पडत असून केंद्र सरकारने यावर तात्काळ नियंत्रण आणावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले.
गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे जनतेवर अन्याय होत असून सरकारने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीतर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, धनंजय गाडेकर, सचिन चौगुले, नगरसेवक शशिकांत लोळगे, उत्तमराव घोरपडे, नीलम सोळंकी, रणजीत बोठे, गणेश सोमवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनात सुधीर म्हस्के, अनिल बोठे, उत्तमराव मते, ज्ञानेश्वर वर्पे, राजेंद्र निर्मळ, राजेंद्र अग्रवाल, पुंडलिक बावके, अमोल गायके,सदाशिव गाडेकर, मुन्ना फिटर, जयसिंग सातव, शिवप्रसाद आहेरसह महिला प्रतिनिधी, लोणी खुर्द ग्रामपंचायत सदस्या आशा आहेर, सुनिता कोरडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





