Noise Pollution: रिक्षा की चालता-फिरता डीजे? कर्णकर्कश गाणी अन् लख्ख दिव्यांमुळे नागरिक त्रस्त
Noise Pollution: देहूरोड आणि पिंपरी-चिंचवड परिसरात रिक्षांमध्ये मोठ्या क्षमतेचे स्पीकर आणि तीव्र LED दिवे लावून वाहतूक नियमांची पायमल्ली.

– रामकुमार आगरवाल
Noise Pollution – शहरातील काही तीन आसनी रिक्षाचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. रिक्षांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली जात आहे. त्यावर डीजेसारखी ध्वनिक्षेपण यंत्रणा बसवून कर्णकर्कश आवाजात गाणी वाजविली जात आहेत. काही रिक्षाचालक गाणीही मोठ्या आवाजात वाजवित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
त्यामुळे पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि वाहनचालकांमध्ये या प्रकाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. देहूरोड परिसरासह पिंपरी-चिंचवड शहरातील काही परिसर, भाजी मंडई, बसथांबे आणि विविध व्यावसायिक आस्थापनांसमोर काही रिक्षा मोठ्या आवाजात गाणी वाजवत उभ्या राहत आहेत. रिक्षांवर रंगीबेरंगी एलईडी दिवे, अतिरिक्त ध्वनिक्षेपक आणि मोठी ध्वनी यंत्रणा बसविण्यात आली आहे.
मुख्य बाजारपेठेत या रिक्षा मोठ्या आवाजात गाणी वाजवत उभ्या राहत असल्याने व्यापारी आणि दुकानदारही त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी रिक्षा दुकानांसमोर उभ्या केल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ध्वनीप्रदूषणासोबतच वाहतूक कोंडीची समस्याही वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भाजी मंडई परिसरात सकाळपासून मोठी गर्दी असते.
या ठिकाणी कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक ठिकाणी ध्वनीची मर्यादा पाळली जावी, अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून होत आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरातून ये-जा करताना विद्यार्थ्यांनाही अशा रिक्षांचा त्रास सहन करावा लागत आहे.
मोठ्या आवाजात गाणी वाजवत रिक्षा चालविण्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढतो. रुग्णालय परिसरात शांतता राखणे अत्यंत आवश्यक असते. मात्र काही रिक्षाचालक रुग्णालये पाहूनही आवाज कमी करत नाहीत. त्यामुळे रुग्णालये, शाळा आणि अन्य संवेदनशील ठिकाणांच्या परिसरात ध्वनीप्रदूषण करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वेगळेपणा दाखविण्याची स्पर्धा
आपले वाहन इतरांपेक्षा वेगळे दिसावे, या शर्यतीत काही रिक्षांवर मोठ्या प्रमाणात लख्ख विद्युत रोषणाई केली जात आहे. रात्रीच्या वेळी या दिव्यांचा थेट प्रकाश समोरील वाहनचालकांच्या डोळ्यांवर पडत असल्याने त्यांना काही क्षणांसाठी समोरील रस्ता दिसेनासा होतो. त्यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. काही रिक्षांवरील कंपन्यांनी बसवून दिलेल्या अधिकृत दिव्यांमध्ये बदल करून त्यांना रंगीबेरंगी एलईडी दिवे लावले जात आहेत.
त्याचबरोबर रिक्षांच्या बाहेरील बाजूस एलईडी स्ट्रिपही बसविल्या जात आहेत. या दिव्यांचा प्रकाश अतिशय तीव्र असल्याने समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर त्याचा थेट परिणाम होतो. अचानक आलेल्या लख्ख प्रकाशामुळे काही क्षणांसाठी दृष्टी धूसर होऊन वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते.






