Aditya Thackeray : भाषेला नव्हे, भाषेच्या सक्तीला विरोध ! हिंदी भाषा मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरून राज्यात खळबळ उडाली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू केले आहे. त्यामुळे त्या त्या राज्याच्या सरकारने विचार करून आपल्या राज्यात तीन कोणत्या भाषेचे शिक्षण लागू करायचे आहे, तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने राज्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांचे शिक्षण पहिलीपासून सक्तीचे केले आहे.
पण मराठी आणि इंग्रजी व्यतिरक्त पहिलीपासूनच्या मुलांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती नको, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मनसेनंतर आता सर्वच राजकीय पक्ष याविरोधात आवाज उठवू लागले आहेत. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी द्वेषी भाजप, असे म्हणत सरकारला सवाल विचारले आहेत.
ठाकरे गटाचे युवाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी भाजप आणि सोबतच मुंबईकरांनाही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच.
त्याविरुद्ध आंदोलन सुरू असताना आणि मराठी माणूस पेटून उठलेला असताना, आपल्या लक्षात येते का? की मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपचे काय चालले? तसेच, गिरगाव चौपाटी येथे उद्धव ठाकरेंनी मुंबईत सुरू केलेले ‘मराठी रंगभूमी दालन’ गुपचूप रद्द करायचे, तिसरीकडे मराठी भाषा भवनात इतर कार्यालये घुसवून त्याचे महत्व कमी करायचे आणि त्यातूनही मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर करून घोंगडे भिजवत ठेवायचे! असा आरोप त्यांनी केला आहे.
मराठीला विरोध कोणाचा असेल?
त्याशिवाय, भाजप हे सर्व कशासाठी करत आहे? असा सवालही त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. गिरगाव चौपाटी येथे मराठीला विरोध कोणाचा असेल? स्थानिकांचा तर नव्हता, मग स्थानिक भाजप आमदाराने केला का? की कुठल्या बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? याचे उत्तर महाराष्ट्र द्वेष्टे भाजप देणार का? आणि यांचा हा खेळ आपण मुंबईकर वेळेत ओळखणार का? असे सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.




