Hardeep Puri: मध्य पूर्वेतील संघर्षामुळे देशात इंधनटंचाईच्या चर्चा सुरू असताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी लोकसभेत स्पष्ट केले की, भारतात पेट्रोल, डिझेल किंवा अन्य कोणत्याही इंधनाचा तुटवडा नाही. एलपीजी गॅसबाबत पसरलेली भीती केवळ “ग्राहकांच्या चिंते”मुळे निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. संसदेत काय म्हणाले पुरी? “पेट्रोल, डिझेल, रॉकेल, विमान इंधन (ATF) किंवा फ्युएल ऑईल यांचा कोणताही तुटवडा नाही. या सर्व इंधनांची उपलब्धता पूर्णपणे सुनिश्चित आहे,” असे पुरी यांनी सांगितले. होर्मुझ सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी प्रत्यक्षात बंद झाल्याचे मान्य करताना पुरी म्हणाले की, हे व्यत्यय अभूतपूर्व आहे. मात्र, या परिस्थितीला तोंड देताना भारताने आपले कच्च्या तेलाचे स्रोत वेगाने वैविध्यपूर्ण केले आहेत. आता भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीपैकी ७० टक्के आयात होर्मुझबाहेरील स्रोतांकडून होत आहे, जी संकटापूर्वी ५५ टक्के होती. भारत सध्या जगभरातील सुमारे ४० देशांकडून कच्चे तेल आयात करतो. २००६-०७ मध्ये हा आकडा केवळ २७ देश होता, असे त्यांनी नमूद केले. व्यावसायिक LPG टंचाईवर काय म्हणाले? हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांनी व्यावसायिक LPG तुटवड्याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर पुरी यांनी स्पष्टीकरण दिले. “व्यावसायिक LPG पूर्णपणे मुक्त बाजारात बाजारभावाने विकले जाते. यावर सरकारी अनुदान नाही, नोंदणी नाही, बुकिंगची आवश्यकता नाही. कोणीही कितीही सिलिंडर खरेदी करू शकत होते,” असे त्यांनी सांगितले. हेही वाचा – तेल वाहतुकीसाठी इराणने भारताला परवानगी दिली की नाही? ‘त्या’ वृत्तावर परराष्ट्र मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण या अनियंत्रित पुरवठा साखळीचा काळाबाजारासाठी दुरुपयोग होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने नियमन लागू केले असल्याचे पुरी यांनी सांगितले. “हे काळाबाजार थांबवण्यासाठी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तेल विपणन कंपन्यांचे (OMC) क्षेत्र अधिकारी आणि भेसळविरोधी पथके वितरक स्तरावर समन्वय साधत असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी बैठक घेऊन राज्य प्रशासनाला केंद्राच्या पुरवठा व माहिती व्यवस्थेशी जोडले आहे. विरोधकांवर टीका – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी LPG टंचाईवरून सरकारला प्रश्न विचारल्यानंतर पुरी यांनी प्रत्युत्तर दिले. “गेल्या पाच दिवसांत LPG उत्पादन वाढवण्यात आले आहे. विरोधक उगाचच घबराट पसरवत आहेत,” असे ते म्हणाले. “पश्चिम आशियातील संघर्षात भारताची कोणतीही भूमिका नसताना आपल्याला त्याचे परिणाम जबाबदारीने हाताळावे लागत आहेत,” असे ते म्हणाले. त्यांनी सर्व खासदारांना “अफवा पसरवणे” टाळण्याचे आवाहन केले. दरम्यान, पुरी बोलत असताना विरोधी सदस्यांनी निषेध केला व घोषणाबाजी केली.