US Israel Iran War: तेल वाहतुकीसाठी इराणने भारताला परवानगी दिली की नाही? ‘त्या’ वृत्तावर परराष्ट्र मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण
US Israel Iran War: साप्ताहिक पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि ईरानचे परराष्ट्र मंत्री यांच्यात अलीकडे तीनवेळा चर्चा झाली आहे.

US Israel Iran War: इराणकडून भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी मिळण्याच्या वृत्तांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, या विषयावर अद्याप कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मात्र भारत आणि ईरान यांच्यात सागरी सुरक्षा व ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
साप्ताहिक पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि ईरानचे परराष्ट्र मंत्री यांच्यात अलीकडे तीनवेळा चर्चा झाली आहे. शेवटच्या चर्चेत जहाजांची सुरक्षा आणि भारताची ऊर्जा सुरक्षा या विषयांवर बोलणे झाले. मात्र त्यापुढे सध्या काही सांगणे उचित नसल्याचे त्यांनी नमूद केले.
होर्मुझ जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाचा मार्ग –
नवी दिल्ली आणि तेहरान यांच्यातील राजनयिक चर्चेनंतर ईरान भारतीय ध्वज असलेल्या तेल टँकरांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यास तयार होऊ शकतो, अशा बातम्या समोर आल्या होत्या. हा सागरी मार्ग जगातील तेल व गॅस व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे तो सध्या चर्चेत आहे.
हेही वाचा – सेन्सेक्स 829 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे 1.75 लाख कोटी रुपये बुडाले
इराकमध्ये टँकरवर हल्ला; एक भारतीय ठार, १५ सुरक्षित –
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या मालकीच्या कच्च्या तेलाचा टँकर ‘सेफसी विष्णु’ वर बुधवारी इराकच्या बसरा बंदराजवळ झालेल्या हल्ल्यात एक भारतीय खलाशी ठार झाला. जहाजावरील उर्वरित १५ भारतीय खलाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बगदादस्थित भारतीय दूतावास इराकी अधिकाऱ्यांशी आणि वाचलेल्या भारतीय खलाशांशी संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
याशिवाय मंत्रालयाने बुधवारी पुष्टी केली होती की, पश्चिम आशियात झालेल्या विविध हल्ल्यांमध्ये भारतीय नागरिक सवार असलेल्या व्यापारी जहाजांवरील दोन भारतीयांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे.





