खतांचा तुटवडा नाही, लवकरच बिगर युरिया खतावरील अनुदानाचे दर जाहीर करणार – केंद्रिय खत सचिव

नवी दिल्ली – देशात खताचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे खरीप हंगामात खताची अजिबात टंचाई निर्माण होणार नाही, असा दावा केंद्रीय खत सचिव आर के त्रिवेदी यांनी यांनी केला आहे. केंद्र सरकार लवकरच बिगर युरिया खतावरील अनुदानाचे दर जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.
खरीप हंगामाच्या तयारी संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील शेतकरी जून पासून सुरु होणाऱ्या खरीप हंगामासाठी मशागत करीत आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याच खताचा तुटवडा निर्माण होणार नाही. यासाठी केंद्र सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. खाताच्या आयातीसाठी लघु पल्ल्याच्या आणि दीर्घ पल्ल्याच्या आयात योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना पुरेसे खत योग्य भावात मिळेल.
भारताला 2022 च्या खरीप हंगाम मध्ये साधारणपणे 354 लाख टन खत लागणार आहे. सध्या देशामध्ये 485 लाख टन एवढे खत आहे. त्यामध्ये आयात खताचा वाटा 104 लाख टनाचा आहे. तर देशांतर्गत खत निर्मितीचा वाटा 254 लाख टन आहे. देशाला खरीप हंगामामध्ये साधारणपणे 179 लाख टन युरिया लागतो. मात्र भारतामध्ये सध्या 256 लाख युरियाचा साठा आहे.
भारताला 58 लाख टन डाय अमोनिअम फॉस्फेटची गरज असते. मात्र भारताकडे सध्या 81 लाख टन अमोनियम फॉस्फेट आहे. पोटॅश खतांची भारताला 19 लाख टनाची गरज असताना आपल्याकडे 29 लाख टन पोटॅश खत आहे. ज्या खताची आयात करण्याची गरज आहे. त्या खताच्या आयातीसाठी भारत सरकारने संबंधित देशाबरोबर आयात करार केले आहेत आणि हे खत भारतामध्ये उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे खरीप हंगामात खताची कसली टंचाई निर्माण होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
युध्दाचा खरीपावर परिणाम नाही
भारताचे काही खत नियातदार रशियाकडून कच्च्या मालाची आयात करतात. मात्र ही आयात प्रक्रिया अगोदरच पूर्ण झालेली आहे. त्यामुळे खरीप हंगामात भारताला खताची टंचाई भासणार नाही. मात्र जर युद्ध रेंगाळले तर रब्बी हंगामावेळी काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. मात्र त्याच्या तयारीसाठी भारताकडे पुरेसा वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.





