Pune : शेततळे योजनचे अनुदान १ लाख करण्याचा विचार

पुणे : राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत ५० हजार अनुदान दिले जात असे. ते वाढवून ७५ हजार केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी असून ते १ लाख रुपयांपर्यंत कसे वाढविता येईल यावर विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे आदेशही त्यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, हिरामण मांडेकर, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्याने ॲग्री हॅकॅथॉनचा उपक्रम राबविला आहे. त्याचा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग होईल. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्याचा वापर करण्यास सुरूवात केल्यानंतर त्याचे फायदे लक्षात आल्यावर मागणी वाढेल. विविध पिकांसाठी याचा अवलंब व्हावा म्हणून अधिक तरतूद करण्यात येईल.
याबैठकीत इंद्रायणी भाताला भौगोलिक ओळख (जीआय) मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली. त्याअनुषंगाने कृषी विभागाने तसा प्रस्ताव करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या रकमेत वाढ व्हावी, वनविभागाच्या हद्दीतील जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत, अशी मागणीही आमदार कुल यांनी केली. त्यावर कार्यवाहीचे देश पवार यांनी दिले.
अजित पवारांच्या सूचना
– बियाणे, किटकनाशकांच्या तक्रारींकडे लक्ष द्या.
-बोगस बियाणे, खते, किटकनाशकांवर कठोर कारवाई करा
-डोंगरी भागातील पदे भरण्याची कार्यवाही करा
-लाभाची रक्कम महाडिबीटीमार्फत मिळण्यासाठी प्रयत्न करा.





