Indapur : संकटाच्या काळात राजकारण नको
Indapur : मयूर पाटील म्हणाले, इंदापूरचे तहसीलदार योग्य पद्धतीने काम करीत आहेत. सध्या शेतकरी संकटात आहे. त्यामुळे या परिस्थितीत आम्हाला राजकारण करायचे नाही.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना तातडीने मदत मिळावी, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत तसेच पाणी उपलब्धतेचे नियोजन करावे, या मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने इंदापूर तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे नेते मयूर पाटील यांनी तहसीलदारांच्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक करत, शेतकर्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलपणे कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मयूर पाटील म्हणाले, इंदापूरचे तहसीलदार योग्य पद्धतीने काम करीत आहेत. सध्या शेतकरी संकटात आहे. त्यामुळे या परिस्थितीत आम्हाला राजकारण करायचे नाही. भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्यांना तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमच्या भावना आणि शेतकर्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा आहे. तालुक्यातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवावा आणि आवश्यक मदतीसाठी प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही भाजपच्या शिष्टमंडळाने केली.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप पिकांवर परिणाम झाला असून, शेतकर्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून पात्र शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच शेतकर्यांच्या कर्जवसुलीस तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. नीरा व भीमा नदीवरील बंधार्यांमध्ये उपलब्ध होणारे पाणी अडविण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, तसेच शेतकर्यांना बियाणे व अन्य कृषी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.
निवेदनावेळी भारतीय जनता पार्टीचे मयूर पाटील, माऊली चवरे, गजानन वाकसे, तेजस देवकाते, राम आजबे, राजकुमार जठार, तानाजी मारकड, अमोल शिंदे, सचिन शेंडे, रोहन महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





