पुणे | बारामतीसाठी एक जणही इच्छूक नाही ?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मात्र बारामतीसाठी अद्याप एकाही इच्छुकाने मुलाखत दिलेली नाही.
या मतदारसंघासाठी खास रणनिती असल्याने उमेदवार नंतर जाहीर करण्याची भूमिका शरद पवार यांच्या पक्षाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरंच अजित पवारांच्या विरोधात शरद पवार यांचा पक्ष उमेदवार देणार का ? अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील बारामती वगळता इतर सर्व विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून राज्यभरातून आतापर्यंत १ हजार ६८० इच्छुकांनी अर्ज केले.
त्यातील १ हजार २८० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. तर मुंबई आणि कोकणातील ४०० इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारपासून मुंबईत होणार आहेत.
बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे “तुतारी’ हाती घेऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
मात्र पक्षाकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीस ते उपस्थितच राहिले नाहीत. बारामतीसाठी कोणीही मुलाखत दिलेली नाही. याबाबत खासदार सुळे म्हणाल्या, “बारामतीच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीबाबत पुढच्या आठ दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.
तर, आमदार रोहित पवार म्हणाले, “बारामती हा खास मतदारसंघ आहे. बारामतीतून कोण इच्छुक आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. इच्छुक मुंबईला शरद पवार यांची भेट घेऊ शकतात. खास रणनीती असल्याने उमेदवार नंतर घोषित होईल.’





