Pune : राज्याची लढाई पुन्हा जिंकता येईल

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जय्यत तयारी करण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी पक्षनिष्ठा कायम ठेवत एकदिलाने पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केल्यास राज्याची लढाई पुन्हा जिंकता येईल. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनाचीही तयारी ठेवायला हवी, असा सल्ला देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोबल वाढविण्याला प्राधान्य दिले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे २६ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिग्गज नेत्यांनी मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष संघटना मजबुतीकरण यावर नेत्यांनी भाषणाद्वारे प्रकाश टाकला. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या कारभारावर सडकून टीका केली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते.
एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे देशात केवळ दोनच खासदार होते.आता तोच पक्ष देशातील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नका. आपण सर्वजण ताकदीने कामाला लागलो, तर या राज्याची लढाई पुन्हा एकदा जिंकू शकतो, अशा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आता तुकाराम विरुद्ध नथुराम अशी लढाई असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. महत्त्वाच्या प्रश्नांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी शरद पवार यांना विरोधकांकडून विनाकारण टीकेचे केंद्रबिंदू केले जात असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
वैष्णवी हगवणे या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्याला हादरवले. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मेळाव्यात भाष्य केले. हगवणे कुटुंब हे सुसंस्कृत व काँग्रेसच्या विचाराचे होते. मात्र, आता या कुटुंबाची काय स्थिती झाली आहे. या शिकलेल्या कुटुंबाने काय केलेय बघा. आपल्याला असा महाराष्ट्र नको आहे. त्यामुळे राज्यात सामाजिक सुधारणा करण्याची आवश्यकता असून, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जबाबदारी आहे. आपल्याला हुंडामुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे. केवळ सत्तेत जायचचे, एवढेच आपले लक्ष्य असता कामा नये, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. पूर्ण ताकदीने नागरिकांच्या सामाजिक प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले. राज्याची स्थिती खूप गंभीर आहे. त्याअनुषंगाने लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याची घोषणाही सुळे यांनी केली.
आता विचाराऐवजी राजकारणाची लढाई होते. सत्ता येते अन जाते; पण सत्ता नसतानाही जो लढतो, तोच खरा मावळा असतो. या मावळ्यांच्या बळावरच विजयश्री खेचून आणता येईल, असे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. सत्ता नसली तरी संघर्ष करण्याचा शिकले पाहिजे. तुम्ही लढ म्हणा, आम्ही लढायला तयार असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.
जबाबदारीतून मुक्त करा – जयंत पाटील
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सात वर्षे काम करण्याची संधी मिळाली. यातून प्रामाणिकपणे काम केले. आजवर मिळालेल्या संधीसाठी शरद पवार व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही आभार मानतो. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. आता पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे, असे म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंतीच केली. यावर कार्यकर्त्यांनी नाही ….नाही, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख सहकारी एकत्र बसू चर्चा करून सामूहिकपणे योग्य तो निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाची काहीच ठोस घोषणा मेळाव्यात झाली नाही.





