महायुतीमुळे महाराष्ट्राची अधोगती : जयंत पाटील

मांजरी – लोकसभेत फटका बसल्यानेच शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याची तिजोरी उघडून घोषणांचा पाऊस सरू केला. सगळेच लाडके असल्याचे सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी केली. राज्यावर लाखो कोटींचे कर्ज केले.
मात्र, २० नोव्हेंबरपर्यंतच बहिणी लाडक्या राहणार आहेत. त्यानंतर नाही, अशी टिका करीत महापौर म्हणून प्रभावी काम केलेले प्रशांत जगताप यांना हडपसरच्या प्रतिनिधीत्वाची संधी द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ झेड कॉर्नर मांजरी येथे आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, प्रदेश युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, माजी उपमहापौर निलेश मगर, बंडुतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, पूजा कोद्रे, शिवसेना उपशहरप्रमुख समीर तुपे, प्रवीण तुपे, दिलीप तुपे, विजय देशमुख, यशवंतराव गोसावी, गजेंद्र मोरे, शैलेंद्र बेल्हेकर आदी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
प्रशांत जगताप म्हणाले की, गेल्या पाच वर्षात हडपसरच्या नागरिकांना काय मिळाले, याचा विचार करा. चार वर्षे सत्तेत राहूनही आमदारांना प्रश्न सोडवता आलेले नाहीत. वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, गुन्हेगारी, ड्रग्जमाफी, कोयता गॅंगमुळे हडपसरचे नाव बदनाम झाले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी अकार्यक्षम आमदारांना घरी बसवा. यावेळी इलियास इसाक बागवान, आकाश गायकवाड, संजय येरळे, सुजल जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.




