कुडाळ : भाजपसह महायुतीतील घटक पक्षातील लोकांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, याबाबत आमचं ठरलंय. ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो, त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील लोक आमच्याकडे घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं मंत्री उदय सामंत म्हणाले. कुडाळ एमआयडीसी येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. यावेळी उदय सामंत यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना शिवसेनेत येण्यासाठी खुली ऑफर दिली. उदय सामंत म्हणाले, वैभव नाईक शिवसेनेत आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, आमदार निलेश राणेसुद्धा स्वागतच करतील आणि पक्ष संघटना वाढीसाठी एक संघपणे काम करतील, असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. Uday Samant | काय म्हणाले उदय सामंत? उदय सामंत म्हणाले, भाजपसह महायुतीतील घटक पक्षातील लोकांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, याबाबत आमचं ठरलं आहे. ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो, त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील लोक आमच्याकडे घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं म्हणत वैभव नाईक शिवसेनेत आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, आमदार निलेश राणेसुद्धा स्वागतच करतील आणि पक्ष संघटना वाढीसाठी एक संघपणे काम करतील, असं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, महायुतीत प्रत्येकाला प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, पण काही लोकांनी माझ्या विधानाचा गैरसमज करून घेतला आहे. आमच्या महायुतीतील नेते पालकमंत्री नितेश राणे माझ्या मतदारसंघात येतील आणि पक्ष संघटनेबाबत काय निर्णय घेतील तर मला दुःख वाटण्यासारखं काहीच नाही, या मताचा मी आहे, असं सामंत म्हणाले. आपल्या महायुतीत वाद होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे. भाजप जिल्हाध्यक्षांना काही शंका असेल तर त्यांनी कधीही आपल्याकडे यावं, बोलावं, कोणताही भाजपचा पदाधिकारी आम्ही शिवसेनेत घेणार नाही. आपला मित्र पक्ष दुखावेल, असं भाषणसुद्धा मी केलेले नाही. याबाबत नितेश राणे, बावनकुळे यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे, त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षांनी याबाबत त्यांच्याशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली असती तर अधिक बरं झालं असत, असं मला वाटत, असंही उदय सामंत यावेळी म्हणाले.