Breastfeeding: आईचं दूध बाळासाठी अमृतासारखं असतं. नवजात बाळाच्या योग्य वाढीसाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी स्तनपानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बाळ जन्मल्यापासून ते सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचं दूध दिलं पाहिजे. त्यानंतर किमान दोन वर्षांपर्यंत आईच्या दुधासोबत पूरक आणि पोषक अन्न देणं आवश्यक असतं. मातेच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषकतत्त्वं असतात. आईचं दूध नैसर्गिक, निर्जंतुक आणि सहज पचणारे असते. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्तनपानामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होतो. भविष्यात रक्तदाब, मधुमेह, दमा, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. breastfeeding तरीही समाजात स्तनपानाबाबत अनेक गैरसमज आहेत. काही महिलांना सिझेरियननंतर सुरुवातीच्या दिवसांत दूध येत नाही. काही माता कुपोषित असतात, तर काहींना इतर वैद्यकीय कारणांमुळे स्तनपान शक्य होत नाही. याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो आणि कुपोषणाचा धोका वाढतो. जगभरात कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या मुलांपैकी मोठा टक्का पहिल्या वर्षातच बाळ दगावते, हे चिंताजनक वास्तव आहे. स्तनपानाचे फायदे केवळ बाळालाच नाही, तर आईलाही होतात. प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते. अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो. गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत मिळते. पुढील आयुष्यात हाडांच्या ठिसूळपणाचा धोका कमी होतो. तसेच स्तन, अंडाशय आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. प्रसूतीनंतर शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू केल्यास दूधनिर्मिती चांगली होते. पहिल्या दोन-तीन दिवसांत येणाऱ्या चीक दुधात भरपूर पोषकतत्त्वं आणि रोगप्रतिकारक घटक असतात. अलीकडील संशोधनानुसार या दुधात स्टेमसेल्सचे प्रमाण अधिक असल्याने बाळाला नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते. स्तनपान ही आई आणि बाळामधील भावनिक नातं घट्ट करणारी प्रक्रिया आहे. बाळ जितकं अधिक वेळा अंगावर पाजेल, तितकी दूधनिर्मिती वाढते. मात्र, स्तनपान देताना आई मानसिकदृष्ट्या प्रसन्न असणं महत्त्वाचं आहे. ताणतणाव, चिंता किंवा भीती असल्यास दूध येण्यावर परिणाम होऊ शकतो. Breast milk योग्य पद्धतीने स्तनपान देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चुकीच्या पद्धतीमुळे आईला पाठदुखी, स्तनांना सूज, ताप येणं यासारख्या समस्या होऊ शकतात आणि बाळालाही पुरेसं दूध मिळत नाही. त्यामुळे आईला आरामदायी वाटेल अशा स्थितीत, पाठीला आधार देऊन स्तनपान द्यावं. बाळ सहा महिन्यांपर्यंत आईच्या दुधावरच वाढू शकतं. या काळात वेगळं पाणी देण्याची गरज नसते, कारण आईच्या दुधातूनच बाळाची तहान आणि भूक दोन्ही भागतात. बाळाची सुदृढ वाढ, मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आणि आयुष्यभराचं भावनिक नातं जोपासण्यासाठी स्तनपान अत्यावश्यक आहे. मातेचं दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम पोषण आहे, याची जाणीव प्रत्येक आईने आणि समाजाने ठेवणं गरजेचं आहे.